Gold Hallmarking: दागिन्यांच्या हॉलमार्किंगसाठी मिळणार सवलत?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ ऑगस्ट । केंद्र सरकारकडून सोन्याच्या दागिन्यांसाठी अनिवार्य करण्यात आलेल्या हॉलमार्किंगसाठीची मुदत वाढवली जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि सराफ व्यापाऱ्यांमध्ये शनिवारी यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीत सोन्याच्या दागिने हॉलमार्क करुन घेण्यासाठीच्या मुदतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

16 जूनपासून देशभरात हॉलमार्किंगच्या नियमाची अंमलबजावणी झाली होती. त्यानुसार आता सोन्याची विक्री करताना त्यावर हॉलमार्क असणे बंधनकारक आहे. मात्र, या सगळ्याविषयी ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्येही पुरेशी स्पष्टता नसल्याचे वारंवार दिसून आले आहे. तसेच हॉलमार्किंग केंद्रांची संख्याही मर्यादित असल्याने दागिने हॉलमार्क करुन घेण्यासाठी सराफ व्यापाऱ्यांना बराचकाळ तिष्ठत राहावे लागत होते. त्यामुळे देशभरातील सराफ व्यापारी प्रचंड नाराज होते. हॉलमार्किंगचा निषेध करण्यासाठी 23 ऑगस्टला सोन्याचे व्यवहार आणि ज्वेलर्स बंद ठेवून प्रतिकात्मक आंदोनलही करण्यात आले होते. ज्वेलर्स व्यावसायिकांच्या देशभरातील 350 संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला होता.

सध्याच्या HUID प्रणालीच्या माध्यमातून दागिन्यांच्या हॉलमार्किंगसाठी 5 ते 10 दिवसांचा अवधी लागतो. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. हॉलमार्किंगमुळे सोन्यात कोणतीही भेसळ होणार नाही, असे सरकारला वाटते. मात्र, लहान व्यापाऱ्यांना सरकारने केवळ आपल्यावर नजर ठेवण्यासाठी हॉलमार्किंगचा नियम केल्याची भावना आहे. हॉलमार्किंगची प्रक्रिया प्रचंड वेळखाऊ आहे. अशा पद्धतीने दागिने हॉलमार्क करवून घ्यायचे झाल्यास यंदा तयार झालेल्या दागिन्यांना हॉलमार्क करवून घेण्यासाठी तीन ते चार वर्ष लागतील, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *