सर्वांना लोकल प्रवासाची मुभा मिळणार ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ ऑगस्ट । पंधरा दिवसांपूर्वी लसधारकांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा मिळाल्यानंतर, मुंबई लोकलमधील गर्दी संपूर्णपणे नियंत्रणात आहे. या पंधरवड्यात मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एकूण तीन लाख ८६ हजार पासची विक्री झाली. यामुळे आता मुंबई महापालिका आणि राज्य सरकार सर्वसामान्यांना लोकलमुभा देण्याची घोषणा केव्हा करणार, याकडे नजरा लागल्या आहेत.

करोनाच्या साथीची दुसरी लाट ओसरत असताना, लोकलमधील गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी टप्प्याप्प्प्याने लोकलमुभा देण्यात येणार असल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आले. त्यानुसार पहिल्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना, तर त्यानंतर दुसऱ्या टप्यात करोना प्रतिबंधक लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या प्रवाशांना म्हणजेच लसधारकांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली.

लसधारकांना लोकलमुभा देण्याची घोषणा झाल्यानंतर, ११ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट या काळात मध्य रेल्वेवर रोज सरासरी १८ हजार यानुसार एकूण दोन लाख ७४ हजार ९८१ मासिक पासची विक्री झाली, तर पश्चिम रेल्वेवर दररोज सात हजारच्या सरासरीने एक लाख ११ हजार ६०७ पासची विक्री झाली आहे.

ऑगस्ट महिन्यात पश्चिम रेल्वेच्या वातानुकूलित लोकलसाठी एक हजार ९०७ तिकिटे आणि एक हजार ४९३ पासची विक्री झाली. वातानुकूलित लोकलचे भाडे जास्त असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. यामुळे अद्याप वातानुकूलित लोकलला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. सर्वांसाठी लोकल सुरू झाल्यानंतर या लोकलला चांगला प्रतिसाद लाभेल, असा दावा रेल्वे अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *