महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ ऑगस्ट । मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड झालेल्या चर्चेने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. याकडे नारायण राणे यांचे लक्ष वेधले असता त्यांनी अगदी मोजक्या शब्दांत त्यावर प्रतिक्रिया दिली. ( Narayan Rane On CM Thackeray Fadnavis Meeting )
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने नारायण राणे यांना अटकेच्या कारवाईला सामोरे जावे लागले. हे अटकनाट्य संपल्यानंतर शुक्रवारी रत्नागिरी जिल्ह्यातून राणेंची जन आशीर्वाद यात्रा पुन्हा सुरू झाली. एकीकडे ही यात्रा पुढे जात असतानाच मुंबईत मुख्यमंत्री ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची वार्ता आली. यावर पत्रकारांनी राणे यांची प्रतिक्रिया विचारली असता, या प्रकारच्या भेटी होत असतात, त्यात विशेष काही नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली. भविष्यात भाजप व सेना यांची पुन्हा युती झाली तर तुमची भूमिका काय असेल असा प्रश्न केला असता, आमचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, तो मान्य असेल, असे राणे यांनी नमूद केले.