कोरोनाचे निर्बंध ३० सप्टेंबरपर्यंत वाढविले; पाचस्तरीय रणनीतीवर लक्ष द्या, केंद्र सरकारचे आवाहन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. 29 ऑगस्ट । सणासुदीच्या दिवसात सभा, मेळावे घेऊ नये तसेच गर्दी होऊ देऊ नये याची काळजी घ्यावी, असे निर्देश देतानाच केंद्र सरकारने कोरोनाचे निर्बंध ३० सप्टेंबरपर्यंत वाढविले आहेत. कोरोनाचे हे निर्बंध ३१ ऑगस्ट रोजी समाप्त होणार होते. त्यामुळे ३१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात काही प्रमाणात निर्बंधात सूट देण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.

बहुतांश रुग्ण केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि ओडिशा या राज्यांतील आहेत. देशात असे ४१ जिल्हे आहेत ज्यांचा पॉझिटिव्हिटी रेट १० टक्के आहे, तर दैनंदिन रुग्णसंख्या ३५ ते ४५ हजारच्या दरम्यान आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, दिवाळीपर्यंत म्हणजे सणासुदीच्या काळात हे निर्बंध कायम राहू शकतात. कारण, दररोज एक कोटी लसीकरण झाले तरीही डेल्टा प्लसचा धोका कायम आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांसाठी आणि केंद्रशासित प्रदेशांना स्पष्ट केले आहे की, संसर्ग रोखण्यासाठी स्थानिक निर्बंध लागू करण्यात यावेत.

 

गर्दीच्या ठिकाणी नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. चाचण्या, रुग्णांचा शोध, उपचार, लसीकरण आणि नियमांचे पालन या पाचस्तरीय रणनीतीवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.दरम्यान, मागील २४ तासांत भारतात ४६,७५९ जणांना नव्याने कोविड-१९ विषाणूचा संसर्ग झाला असून, शनिवारी बाधितांची एकूण संख्या ३,२६,४९,९४७ झाली. सक्रिय कोविड रुग्णांच्या संख्येत सलग चौथ्या दिवशी वाढ झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ५०९ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वाधिक १७९ मृत्यू केरळातील असून, महाराष्ट्रातील मृतांची संख्या १७० आहे. एकूण मृतांची संख्या आता ४,३७,३७० झाली आहे. एकूण मृत्यूंत १,३६,९०० मृतांसह महाराष्ट्र आघाडीवर आहे.सक्रिय रुग्णांची भर मागील २४ तासांत १४,८७६ सक्रिय रुग्णांची भर पडल्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या आता ३,५९,७७५ झाली आहे. एकूण बाधितांच्या तुलनेत सक्रिय रुग्णांचे प्रमाण १.१० टक्के आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *