पुण्यात कलाकारांनी केली महाआरती ; “नाट्यगृह लवकर सुरु करा”

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ ऑगस्ट । करोनाची दुसरी लाट ओसरत असताना राज्य सरकारने काही निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र असं असलं तरी सरकारने नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरु करण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे यावर अवलंबून असलेल्या कलाकारांचे हाल होत आहेत. सरकारचं लक्ष याकडे वेधण्यासाठी आज राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी १ सप्टेंबरपासून नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ही घोषणा हवेत विरल्याची भावना कलाकारांमध्ये आहे. पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात नटराजाची महाआरती करण्यात आली. सरकारला जागं करण्यासाठी जागर आणि गोंधळाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अभिनेत्री प्रिया बेर्डे, अभिनेते गिरीश ओक, अभिनेत्री सुरेखा कुडची यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते.

“सरकारला आमची बाजू कळावी म्हणून आम्ही आज या महाआरतीचं आयोजन केलं होतं. आमची मागणी सरकारने मान्य करावी. आम्हाला आश्वासन दिलं होतं. मात्र त्याचं पुढे काही होताना दिसत नाही. त्यासाठी आम्हाला महाआरती करून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. सध्या कलाकरांची स्थिती खूपच बिकट आहे. आम्ही मोर्चे काढू शकत नाही. आम्ही हिंसाचार करू शकत नाही. आम्ही कलाकार आहोत आणि प्रेक्षकांना आम्ही मायबाप म्हणून बघतो. रंगदेवतेला साक्षी ठेवून आम्ही सरकारकडे मागणी केली आहे की, नाट्यगृह सुरू करा. आम्हा कलाकारांना न्याय द्या”, अशी कळकळीची विनंती अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी केली.

“नाटक ही कला अशी आहे की, वर्च्युअल किंवा ऑनलाइन माध्यमातून होऊ शकत नाही. प्रत्यक्ष रंगमंचावर काम करणारे जे कलाकार आहेत. त्यांना समोर प्रेक्षक लागतात. त्यामुळे कलाकारांची कुचंबणा होत आहे. हा एक व्यवसाय आणि त्या व्यवसायावर बऱ्याच जणांचं पोट अवलंबून आहे. आम्ही तीव्र आंदोलन करू शकत नाही. बाकीच्या गोष्टी हळूहळू सुरु होत आहेत. तसं आमचं नाट्यगृह सुरु व्हावं”, असं अभिनेता गिरीश ओक यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *