US Afghanistan: ‘तालिबान आझाद है’, अमेरिकेचा शेवटचा सैनिक काबूलमधून बाहेर!

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ ऑगस्ट । हातात बंदूर, नजर खाली आणि अमेरिकेला परतणाऱ्या विमानाकडे झपझप टाकली जाणारी पावलं…अमेरिकेचा शेवटचा सैनिक काबूलमधून बाहेर पडतानाचा हा फोटो… याच सोबतच अफगाणिस्तानात अमेरिकेकडून राबवल्या जाणाऱ्या गेल्या २० वर्षांच्या मिशनचा अंत झाला.

तालिबानच्या रुपातील दहशतवाद संपवण्याचा प्रण घेऊन अफगाणिस्तानात दाखल झालेली अमेरिकन सेना १९ वर्ष, १० महिने आणि १० दिवसांनंतर तालिबानच्याच हातात अफगाणिस्तानची सत्ता सोपवत बाहेर पडलीय. अफगाणिस्तानातून बाहेर पडणाऱ्या अमेरिकेच्या शेवटच्या सैनिकाचा फोटो खुद्द अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयानं ट्विट केला आहे.

‘तालिबान आझाद है’

काबूल विमानतळावर सोमवारी रात्री उशिरा अमेरिकेच्या सैनिकाच्या माघारीनंतर बंदुकीच्या जोरावर अफगाणिस्तानवर कब्जा करणाऱ्या तालिबाननं ‘स्वातंत्र्याचा’ उत्सव साजरा केला. कतारमध्ये ठाण मांडून बसलेला तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीन यानं आता आपला देश पूर्णपणे स्वातंत्र्य असल्याचं सांगत देशवासियांना शुभेच्छा दिल्या.

‘आज रात्री १२.०० वाजता (अमेरिकेच्या वेळेनुसार) शेवटचा अमेरिकन सैनिक अफगाणिस्तानातून परतला. आपल्या देशाला पूर्णत: स्वातंत्र्य मिळालं. अल्लाहचे आभार. सर्व देशवासियांना मनापासून धन्यवाद’ असं ट्विट सुहैल शाहीन यानं सोमवारी रात्री उशिरा केलं.याचसोबतच, अफगाणिस्तानातील पंजशीर खोरं सोडून उरलेल्या संपूर्ण अफगाणिस्तानावर तालिबाननं वर्चस्व मिळवलंय.

अमेरिकेनं अफगाणिस्तान सोडल्यानंतर एकीकडे तालिबानी स्वातंत्र्योत्सव साजरा करत आहेत. तर दुसरीकडे राजधानी काबूलच्या रस्त्यांवर भयाण शांतता पसरलीय. तालिबाननं दिलेल्या इशाऱ्यानंतर ३१ ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तानातील रेस्क्यू मिशन संपवण्याचा निर्णय अमेरिकेनं घेतला होता. गेल्या १७ दिवसांपासून इथे अडकून पडलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम अमेरिकनं लष्काराद्वारे सुरू होतं. हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठं ‘एअरलिफ्ट मिशन’ ठरलंय. याद्वारे तब्बल १,२०,००० लोकांना अफगाणिस्तानातून सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याचं अमेरिकेनं म्हटलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *