कोरोनावर मात केल्यानंतर निरोगी राहण्यासाठी फॉलो करा ‘हा’ डाएट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ सप्टेंबर । कोरोनातून बरं झाल्यानंतरही अनेक रुग्णांमध्ये विविध आजारांची लक्षणं दिसून येत आहेत. कोविड-19 (Covid-19) रुग्णांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर (Immunity) सर्वात जास्त परिणाम झालेला दिसून येत आहे. यामधून बरे झाल्यानंतरही रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकले नाहीत. एकदा कोरोना संसर्ग झाल्यानंतर पुन्हा संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त आहे. दुसऱ्यांदा कोरोना विषाणूचा संसर्ग तो अधिक धोकादायक रूप धारण करतो. अशा परिस्थितीमध्ये, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे. त्यामुळे रुग्णांनी औषधे (Medicines) आणि मल्टीव्हिटॅमिनसह (MultiVitamins) नियमित आहारात संतुलित आणि पौष्टिक आहार (Diet Food) घेणे आवश्यक आहे.

यूकेमधील(UK) नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या अहवालानुसार (NHS), कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना प्रतिकारशक्ती मिळवण्यासाठी प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांची आवश्यकता असते, त्याकरता पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करण्याची गरज आहे.

प्रतिकारशक्ती वाढवण्यात व्हिटॅमिन सी (Vitamin C) महत्त्वाची भूमिका बजावते. कारण त्याच्या मदतीने शरीरात पांढऱ्या रक्त पेशी तयार होतात. अशा परिस्थितीत द्राक्षे, आवळा, संत्री अशा फळांचा आणि व्हिटॅमिन ‘सी’ युक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा.

लिंबू, पेरू, अननस, पालक, काळी मिरी, टोमॅटो, गाजर, ब्रोकोली आणि पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए, ई आणि सी मुबलक असतात. त्यामुळे दिवसाची सुरुवात आवळा, गाजर याचा रस, हिरव्या स्मूदी किंवा हळदयुक्त दुधाने सुरू करण्याची शिफारस आहारतज्ज्ञ करतात. ग्रीन टी, आलेयुक्त चहानेही दिवसाची सुरुवात करता येते.

नाश्ता (Breakfast) हलका आणि निरोगी असावा. ओट्स, दलिया, कॉर्न फ्लेक्स, इडली, साधा डोसा, ब्राऊन ब्रेड, मिश्र डाळींचे डोसे इत्यादी पदार्थांचा नाश्त्यात आवर्जून समावेश करावा.

दुपारच्या जेवणात (Lunch) घरी बनवलेले पोळी, भाकरी, भात, मसूर, हिरव्या भाज्या यांचा समावेश असावा.

संध्याकाळच्या फराळामध्ये मसालेदार आणि तळलेले अन्नपदार्थ घेण्याऐवजी बदाम, भिजवलेले शेंगदाणे, भाजलेले चणे अशा पदार्थांचा समावेश करावा.

रात्रीचे जेवण (Dinner) खूप हलके असावे. यात खिचडी, पेज अशा पदार्थांचा आहार घ्यावा. झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध प्यावे.

त्याचबरोबर रोग प्रतिकारशक्ती झपाट्याने वाढवण्यासाठी विविध प्रकारची फळे खावीत. फळांचे वेगवेगळे प्रकार तुम्ही आहारात समाविष्ट करू शकता. आंबा कस्टर्ड, टरबूज कोशिंबीर, भाज्यांचा रस आणि कोशिंबीर, रायती यांचा समावेश असू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *