सरकार कोणत्याही सणांविरोधात नव्हे तर करोनाच्या विरोधात – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ सप्टेंबर । महाविकास आघाडी सरकार हे कोणत्याही सणांविरुद्ध नाही तर करोनाच्या विरोधात आहे. केंद्रातील मोदी सरकारनेच सणांच्या काळात संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करत काळजी घेण्यास व गर्दी रोखण्यासाठी आवश्यक निर्बंध घालण्यास राज्य सरकारला सांगितले आहे याकडे लक्ष वेधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या दुटप्पीपणावर बोट ठेवले.

दहीहंडीचा उत्साह आणि उत्सव याला काही काळासाठी आपण मुकलो आहोत याची मला जाणीव आहे. तो थरार, ते उधाण मला अजूनही आठवते. पण आज गर्दी करून उत्सव साजरी करण्यासारखी परिस्थिती नाही. करोनाचे संकट जगभर पसरले आहे. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही शिवसेनेची ओळख. त्यामुळे शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे एक वेगळे नाते आहे. त्यामुळेच शिवसेनेबद्दल लोकांना, ठाणेकरांना वाटणारा विश्वास आजही कायम आहे.

पण दुर्दैवाने आज १०० टक्के राजकारण केले जात आहे. करोनाचे संकट दिसत असताना आरोग्यविषयक सुविधा निर्माण न करता काही जणांना यात्रा काढायच्या आहेत. जनतेचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. हे खूप दुर्दैवी आहे, अशा शब्दांत ठाकरे यांनी भाजपच्या आंदोलनाचा समाचार घेतला.

करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनेही हेच सांगितले आहे. त्यांनी दहीहंडी आणि गणेशोत्सव काळात गर्दी टाळावी अशी सूचना राज्याला पत्र पाठवून केली आहे.

जे आंदोलन करू इच्छितात त्यांना केंद्र सरकारचे हे पत्र आपल्याला दाखवायचे आहे. आपल्या बेशिस्त वागणुकीतून ते शिस्त पाळणाऱ्या लोकांचे जीवन ही अडचणीत आणत आहेत, असेही ठाकरे यांनी सुनावले.

मंदिरे उघडण्यासाठी-सणांच्या वेळी गर्दी करण्यासाठी केलेले आंदोलन हे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेले आंदोलन नाही हेही त्यांनी लक्षात घ्यायला हवे. हा जनतेच्या जीविताचा प्रश्न आहे, असे नमूद करत स्वातंत्र्यलढय़ात भाजपची मातृसंस्था उतरली नव्हती यावरून ठाकरे यांनी अप्रत्यक्षरीत्या चिमटा काढला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Facebook
  • X (Twitter)
  • LinkedIn
  • Mix
  • More Networks
Copy link