महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. 2 सप्टेंबर । पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडा) गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर 1 हजार सदनिकांसाठी लॅाटरी काढण्यात येणार आहे. या सदनिका प्रामुख्याने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांतील असणार आहेत. म्हाडाकडून या वर्षातील ही तिसरी लॅाटरी काढली जाणार आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात पाच हजार 217 सदनिकांसाठी तर, 2 जुलै रोजी 2 हजार 908 सदनिकांसाठी लॅाटरी पध्दतीने ऑनलाइन सोडत काढण्यात आली होती.
त्यानंतर आता 1 हजार सदनिका या नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहेत. या सदनिका प्रामुख्याने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांच्या हद्दीतील आहेत. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया लवकरच जाहीर केली जाणार आहे. या सदनिका पंतप्रधान आवास योजना, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, म्हाडाकडून बांधण्यात आलेले प्रकल्प आणि 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत असणार आहेत, अशी माहिती म्हाडाच्या पुणे विभागाचे मुख्य अधिकारी नितीन माने पाटील यांनी दिली.