राज्यात करोना रुग्ण घटत असताना ‘या’ जिल्ह्यात चिंता वाढवणारे आकडे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ सप्टेंबर । राज्यातील काही जिल्ह्यांत करोनासंबंधी दिलासादायक चित्र समोर येत असले तरी अहमदनगर जिल्ह्यात चिंता कायम आहे. आज जिल्ह्यातील नव्या रुग्णांची संख्या आणखी वाढून ९०१ वर पोहचली आहे. उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत नगर जिल्हा पहिल्या पाच जिल्ह्यांत आहे. संगमनेर आणि पारनेर तालुक्यातील रुग्णसंख्या सुरुवातीपासूनच जास्त आहे. आजही संगमनेरला २०९, पारनेरला १३६, श्रीगोंद्यात १३० नवे रुग्ण आढळून आले आहेत. (Corona Cases in Ahmednagar)

गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सुमारे सातशे ते आठशेच्या आसपास ही संख्या स्थिरावली असताना आज ती नऊशेच्या पुढे गेली. नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी आहे. सध्या जिल्ह्यात साडेपाच हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील ११ टक्के उपचाराधीन रुग्ण नगर जिल्ह्यात आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्यांवर आले आहे. मृत्यदर २ टक्क्यांहून अधिक आहे.

जिल्ह्यातील संगमनेर, पारनेर, श्रीगोंदा, शेवगाव, पाथर्डी या तालुक्यांत रुग्ण संख्या अधिक आहे. इतर तालुक्यांत संख्या कमी जास्त होत असली तरी संगमनेर आणि पारनेरमध्ये सुरुवातीपासूनच ही संख्या जास्त आहे. मधल्या काळात तिथे कडक उपाय करण्यात आले होते. त्यावेळी काही काळ संख्या नियंत्रित राहिली. पारनेर तालुक्यात तहसीलदार विरुद्ध लोकप्रतिनिधी आणि कर्मचारी असा वाद सुरू आहे. त्यातून महसूल कर्मचाऱ्यांचे तहसीलदारांच्या बदलीच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे राजकीय आणि अन्य कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर सुरूच असून त्यासाठी गर्दीही होत आहे. संगमनेरमध्येही कार्यक्रम आणि विवाह सोहळे सुरू आहेत. अलीकडेच निर्बंध शिथील केल्याने विवाह समारंभातील उपस्थितीची अट शिथील करण्यात आली आहे. त्याचाही परिणाम गर्दी वाढण्यात होत आहे. या तुलनेत नगर शहराची लोकसंख्या तुलनेत जास्त असली तरी येथील स्थिती तालुक्यांपेक्षा नियंत्रणात आहे. सणसुदीच्या तोंडावर जिल्ह्यातील समोर आलेले हे आकडे चिंता वाढविणारे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *