पुणे : डेंगीच्या रुग्णांना प्लेटलेटचा तुटवडा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ सप्टेंबर । पुणे : शहरात गेल्या काही दिवसांत डेंगीसह साथीचे इतर आजार वाढू लागल्याने रक्ताचा आणि पर्यायाने प्लेटलेटचा तुटवडा जाणवतो आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांमुळे रक्तदान शिबिरांच्या संख्येत घट झाल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना आणि रुग्णालयांना रक्तासाठी धावपळ करावी लागते आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन रक्तपेढ्या व डॉक्टरांतर्फे करण्यात आले आहे.

डेंगीसह चिकुनगुनिया आणि कर्करोगाच्या रुग्णांना उपचारांसाठी प्लेटलेटची गरज असते. रक्तातून मिळणाऱ्या प्लेटलेट केवळ ५ दिवस उपयुक्त असतात. परंतु, कोरोनामुळे रक्तदान शिबिरात सातत्य नसल्याने प्लेटलेटचा तुटवडा जाणवू लागला आहे. मागणी अधिक आणि पुरवठा कमी, अशी परिस्थिती सध्या निर्माण होत असल्याचे निरीक्षण सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉ. स्मिता जोशी यांनी नोंदवले. यावर उपाय म्हणून रक्तदान शिबिरांची संख्या वाढवण्याची मागणी होत आहे. त्यासह ‘सिंगल डोनर प्लेटलेट’ (एसडीपी) हा एक पर्याय देखील उपलब्ध आहे. रक्तातून मिळणाऱ्या प्लेटलेटला ‘रॅन्डम डोनर प्लेटलेट’ (आरडीपी) म्हणतात. मात्र, याव्यतिरिक्त स्वतंत्र प्लेटलेट दान करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. ज्याला ‘एसडीपी’, असे संबोधले जाते. त्यामुळे सुदृढ नागरिकांनी नियमित रक्तदानासह प्लेटलेटचे दान करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *