महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ सप्टेंबर । देशभरात आता सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. अशातच कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने सणासुदीसाठी नियमावली जारी करत गेल्यावर्षीप्रमाणे घरीच सण साजरे करण्याचं आवाहन केलं आहे. महाराष्ट्र आणि केरळमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे गणेशोत्सव, नवरात्र या सणासुदीच्या दिवसांत करोनाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले आहे. कोविड-19 टास्क फोर्सचे प्रमुख आणि निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के पॉल आणि ICMR महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी पत्रकार परिषद घेत सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये पॉल म्हणाले की, “गणेशोत्सव, दिवाळी, नवरात्र आणि ईद हे सण पुढील दिवसांत येत आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेता गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही सण, उत्सव साजरे करण्याची गरज आहे. घरातच राहून सण साजरे करावेत. सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे ही पूर्वअट आहे.”
देशातील कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. कोरोनाचे रुग्ण आणखी वाढू नये म्हणून काळज घ्यावी लागणार आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात बाजारात गर्दी करु नका. घरातच राहून सण-उत्सव साजरे करा. कोरोना विषाणू आपलं रुप बदलत आहे, त्यावर कुणाचेही नियंत्रण नसते. त्यामुळे गतवर्षीप्रमाणेच यंदाही संयम दाखवून गर्दी करु नये, असे पॉल यांनी जनतेला आवाहन केलं.