टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियाचे १५ खेळाडू शिलेदार निश्चित ? लवकरच होणार घोषणा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.६ सप्टेंबर । टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी १५ खेळाडूंचा समावेश असणाऱ्या भारतीय संघाची अंतिम यादी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्थात बीसीसीआयने निश्चित केली असून यासंदर्भात लवकरच घोषणा होणार आहे. या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या संघांना १५ जणांच्या चमूची यादी नियमांनुसार १० सप्टेंबरपर्यंत जाहीर करावी लागणार आहे. त्यानुसार पुढील एक दोन दिवसांमध्ये बीसीसीआयकडून भारतीय संघाची घोषणा करण्यात येईल, असे सांगितले जात आहे. पण असे असले तरी या संघाची आज दिवसभरामध्ये कोणत्याही क्षणी घोषणा केली जाण्याची चर्चाही क्रीडा वर्तुळात सुरु झाली आहे.

बीसीसीआयच्या सुत्रांनी इनसाइड स्पोर्ट्सला दिलेल्या माहितीनुसार भारतीय संघामधील १५ खेळाडूंची निवड झाली असून संघाची घोषणा चौथ्या कसोटीनंतर केली जाणार आहे. आज जर कसोटी सामना लवकर संपला तर रात्रीच टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा होऊ शकते, असेही सांगण्यात आले आहे. कसोटी सामन्यावर सर्व काही अवलंबून आहे. आज किंवा उद्या यासंदर्भातील घोषणा होऊ शकते. आज सामना वेळेत संपला नाही तर उद्या घोषणा होईल. १५ जणांचा संघ निवडीचे काम पूर्ण झाल्याचे सुत्रांनी म्हटले आहे.

भारतीय संघातील अनेक जागा या निश्चित आहेत, अगदीच मोजक्या खेळाडूंबद्दल शंका असल्यामुळे त्यांच्या निवडीसंदर्भात उत्सुकता कायम आहे. रोहित शर्मा, के. एल. राहुल हे भारतीय संघाचे सलामीवीर असतील हे जवळजवळ निश्चित आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी शिखर धवन आणि पृथ्वी शॉ या दोघांमध्ये चुरस असेल. मधल्या फळीमध्ये कर्णधार विराट कोहली, ऋषभ पंत, सुर्यकुमार यादव आणि इतर खेळाडूंचा समावेश असेल. श्रेयस अय्यरला संघात स्थान मिळते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. अय्यर मार्च महिन्यापासून स्पर्धात्मक सामने खेळलेला नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *