महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ सप्टेंबर । गणेशोत्सव काळात राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना घरगुती दराने वीज पुरवणार असल्याची घोषणा ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे. त्यामुळे मंडळांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गणेशोत्सवादरम्यान महावितरणकडून मंडळांना तात्पुरता वीज पुरवठा केला जातो. सदरच्या विजेसाठी व्यावसायिक दराने वीज बिल आकारणी केली जाते. व्यावसायिक विजेचा प्रतियुनिट दर सहा रुपयांपासून नऊ रुपयांपर्यंत असल्याने मंडळांना मोठा आर्थिक फटका बसतो. त्याची दखल घेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना घरगुती दराने म्हणजे प्रतियुनिट तीन रुपयांपासून सहा रुपयांपर्यंत एवढय़ा दराने वीज पुरवली जाणार असल्याचे ऊर्जा मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच उत्सव काळात ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा केला जाणार असून तांत्रिक बिघाड झाल्यास तत्काळ दुरुस्त करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान मंडळांनी शॉर्टसर्किट होऊन अपघात घडू नये म्हणून चांगली विद्युत उपकरणे वापरावीत, खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे.