दहावी-बारावी बाहेरून परीक्षा देणार आहात ? पाहा अर्ज भरण्याची तारीख

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० सप्टेंबर । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२२ होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी खासगीरित्या फॉर्म नंबर १७ भरून प्रविष्ट होणाऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना १६ सप्टेंबर ते १२ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन नाव नोंदणी अर्ज करता येणार आहे. केवळ ऑनलाइन अर्जच स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे अर्ज ऑफलाइन घेतला जाणार नाही.

कोरोनामुळे दहावी-बारावीच्या २०२१ परीक्षेचा निकाल जुलैमध्ये लागल्याने खासगी विद्यार्थी ऑनलाइन नाव नोंदणीसाठी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या दाखल्यावरील शाळा, महाविद्यालय सोडल्याची तारीख ३१ ऑगस्ट २०२१ अशी ग्राह्य धरावी. हा बदल कोरोनामुळे फक्त २०२२ च्या परीक्षेपुरताच लागू राहील. विद्यार्थ्याच्या वयासाठी ३१ जुलै अशी राहणार आहे. विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, ऑनलाइन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे १७ सप्टेंबर ते १४ नोव्हेंबरपर्यंत संपर्क केंद्र शाळेत किंवा महाविद्यालयात जमा करायची आहेत.

खासगीरित्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच भरायचे आहेत. नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे राज्य मंडळाने दिलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणाचाही ऑफलाइन अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे अशा सूचना राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना दिल्या आहेत.

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ :

दहावी : http://form17.mh-ssc.ac.in

बारावी : http://form17.mh-hsc.ac.in

विद्यार्थी-पालकांसाठी सूचना :

कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर किंवा मोबाईलद्वारे कागदपत्रांचे फोटो काढून ते अपलोड करावेत.

विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे.

अर्ज भरल्यावर त्याची प्रत विद्यार्थ्यांनी अर्जात दिलेल्या ई-मेलवर पाठविण्यात येईल.

विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाइन देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *