महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१२ सप्टेंबर । राजकारणात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची ओळख सडेतोड वक्तव्य करणारे मंत्री अशी आहेच. याचाच पुन्हा अनुभव आला आहे. शनिवारी नागपूरमध्ये (Nagpur) गडकरी यांनी भर कार्यक्रमात पशू-मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आणि प्राध्यापकांना तंबी दिली आहे.
यावेळी गडकरींनी विदर्भातील दुग्धोत्पादन दुप्पट करा. टार्गेट पूर्ण केलं तर गळ्यात फुलांची माळ पडेल, अन्यथा सक्तीची स्वेच्छानिवृत्ती दिली जाईल, या शब्दात गडकरींनी पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आणि प्राध्यापकांना खडसावलं आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू) नागपूरमार्फत शनिवारी पशुवैद्यकीय चिकित्सा संकुल इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी गडकरी बोलत होते. या कार्यक्रमास राज्याचे पशूसंवर्धन मंत्री सुनील केदारही उपस्थित होते.
एवढं बोलून गडकरी थांबले नाहीत तर त्यांनी विचारणा केली की, या नव्या रुग्णालयात वर्षाला किती शस्त्रक्रिया करणार आहेत?, तसंच किती प्राण्यांवर उपचार केले जातील?, इतकंच काय तर जास्त दूध देणाऱ्या किती गायी तयार केल्या जातील? त्याचा आकडाही सांगा, अशी प्रश्नांची रांगच गडकरींनी उपस्थित केली.
तुम्हीच ठरवलेलं ट्रागेट जर तुम्ही पूर्ण करु शकलात, तर तुमच्या गळ्यात फुलांची माळ टाकू, नाहीतर तुम्हाला सक्तीची सेवानिवृत्ती देऊ, असा इशाराच गडकरींनी यावेळी दिला आहे.