युनिक हेल्थ कार्ड लवकरच घेता येणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१३ सप्टेंबर । केंद्र सरकारने आधार प्रमाणेच युनिक हेल्थ कार्डची तयारी पूर्ण केली असून या हेल्थ कार्ड मध्ये संबंधित व्यक्तीच्या आरोग्याची पूर्ण माहिती नोंदविलेली असेल. यामुळे देशात कुठेही गेलात आणि तेथे अचानक काही मेडिकल इमर्जन्सी आली तरी तुमच्या आरोग्याचे सर्व रेकॉर्ड एका क्लिक वर उपलब्ध होऊ शकणार आहे आणि त्यामुळे डॉक्टर त्वरित योग्य ते उपचार करू शकणार आहेत. हे कार्ड घेणे नागरिकांना बंधनकारक नाही तर ऐच्छिक आहे. मात्र कार्ड हवे असेल तर त्यासाठी नोंदणी करावी लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी याच महिन्यात ‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन (एनडीएचएम) लाँच करणार आहेत. या मध्ये डॉक्टर, रुग्णालये, केमिस्ट, लॅबोरेटरिज अशी सर्व माहिती असेल. प्रायोगिक तत्वावर ही योजना गतवर्षी अंदमान निकोबार, चंदिगड, दादरा नगरहवेली, दमन दिव, लडाख आणि लक्षद्वीप येथे सुरु केली गेली होती. तेथे युनिक हेल्थ कार्ड बनविण्याची सुरवात केली गेली आहे. देशभरात ही योजना लवकरच सुरु केली जात आहे.

योजनेची घोषणा होताच गुगल प्ले स्टोर मध्ये एनडीएचएम हेल्थ अॅप उपलब्ध केले जाणार आहे. त्याद्वारे नागरिक नोंदणी करू शकतील. युनिक आयडी १४ डिजीटचा असेल. नोंदणीकृत सरकारी, खासगी हॉस्पिटल, कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वेलनेस सेंटर, कॉमन सर्व्हिस सेंटर येथे हेल्थ कार्ड बनविता येणार आहेत. त्यावेळी नाव, पत्ता, जन्मतारीख अशी सामान्य माहिती द्यावी लागेल. कार्ड धारकाला त्याचे पूर्वीचे वैद्यकीय रिपोर्ट, औषधे यांची माहिती सुरवातीला स्वतःच स्कॅन करून अपलोड करावे लागणार आहेत. मात्र नवीन रिपोर्ट व अन्य माहिती आपोआप अपडेट होत राहणार आहे.

समजा एखादा नागरिक दुसऱ्या गावी गेला आणि तेथे वैद्यकीय उपचार घेण्याची वेळ आली तर या कार्ड वरून तुमचे सर्व हेल्थ रेकॉर्ड जागेवर उपलब्ध होणार असल्याने डॉक्टर सहज आणि विना विलंब उपचार करू शकणार आहेत. त्यामुळे नवे रिपोर्ट काढण्याचा खर्च आणि वेळ वाचणार आहे. कार्ड मध्ये कोणती औषधे दिली गेली, औषध बदलले का, का बदलले याच्याही नोंदी केल्या जाणार आहेत. अर्थात तुमच्या कार्ड मधील माहिती दुसरा कुणी पाहू शकणार नाही. कारण कार्ड एंटर केल्यावर ओटीपी येईल तो दिल्याशिवाय माहिती दिसू शकणार नाही. ही माहिती कॉपी करता येणार नाही तसेच ट्रान्स्फर करता येणार नाही असेही समजते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *