पालघर तालुक्यातील घरांत २४ वर्षांनंतर उजळला प्रकाश

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 -पालघर-
पालघर तालुक्यातील केळवे रोड रेल्वे स्थानकापासून सुमारे चार किलोमीटरवर असणाऱ्या झांजरोळी लारपाडा येथील आठ कुटुंबांच्या घरांत २४ वर्षांच्या अंधकारानंतर सौरऊर्जाद्वारे प्रकाश उजळला. झांझरोळी धरणाच्या क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या या कुटुंबीयांना बंधाऱ्याच्या उभारणीवेळी १९९६मध्ये स्थलांतरित करण्यात आले होते.

झांजरोळी लारपाडा येथील कुटुंबांना भरपाईची रक्कम मिळाल्यानंतर ती बंधाऱ्याच्या पूर्वेकडील आपल्या मालकीच्या जमिनींमध्ये स्थलांतरित झाली होती. लारपाडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वसाहतीमध्ये सध्या आठ ते १० कुटुंबे वास्तव्यास असून, ते भाजीपाल्याची लागवड करतात. या वस्तीवरील चार-पाच मुले शिक्षण घेत आहेत. रात्रीच्या अंधारामुळे त्यांच्या शिक्षणावर परिणाम होत होता. ही बाब लक्षात घेऊन पालघर तालुक्यातील लायन्स क्लब ऑफ केळवे यांच्या मदतीने याठिकाणी सौरऊर्जा प्रणाली बसवण्यात आली. त्यामुळे येथील सुमारे ६० नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

महावितरण कंपनीने बंधाऱ्यावरून या ठिकाणी वीजजोडणी देण्यासाठी पाच-सहा विद्युतपोल उभारले होते. मात्र वन विभागाच्या जागेतून विद्युतप्रवाह नेण्यास वनअधिकाऱ्यांनी आक्षेप घेतल्याने हा संपूर्ण परिसर अंधारातच होता. त्यांना रात्री रॉकेलच्या दिव्यावर अवलंबून राहावे लागत असे. दरम्यान, या भागात चिंच खरेदी करण्यासाठी आलेल्या मनोज चौधरी यांनी लायन्स क्लब ऑफ केळवेची सूत्र हाती घेतल्यानंतर या पाड्यावर सौरऊर्जा प्रणाली बसवण्याचा प्रस्ताव मांडला. याकामी मुंबई येथील इतर क्लबची मदत घेऊन प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. त्यानुसार प्रत्येक घरात दोन दिवे आणि मोबाइल चार्जिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. या वीजव्यवस्थेमुळे खास करून विद्यार्थ्यांना मोठा दिला मिळाला आहे.

या सौरऊर्जा प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी लायन्स क्लबचे चंद्रशेखर घाग, मनोज चौधरी, जगदीश जानी, हर्षद राऊत, हरिहर पाटील, प्रदीप पाटील, विविध पाटील व सहकारी उपस्थित होते. लारपाडा येथे सौरऊर्जा प्रणाली कार्यान्वित केल्याने येथील रहिवाशांनी या सामाजिक संस्थेचे आभार व्यक्त केले आहेत. तसेच वस्तीवर कायमस्वरूपी वीजजोडणी उपलब्ध व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *