दहशतवाद्यांचे मुंबई कनेक्शन; गृहमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१५ सप्टेंबर । मुंबईः दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एकाचं मुंबई कनेक्शन समोर आलं आहे. त्यामुळं महाराष्ट्रात चिंतेच वातावरण पसरलं आहे. यासंदर्भात आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तातडीने एक बैठक बोलावली आहे. (terrorist arrested in delhi)दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशातून विशेष तपास अधिकाऱ्यांनी सहा दहशतवाद्यांना ताब्यात घेतल्याची माहिती विशेष पथकाचे पोलिस आयुक्त नीरज ठाकूर यांनी दिली. तर या दहशतवाद्यांना सीमेपलिकडून पाकिस्तानातून कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्रहिम आर्थिक रसद पुरवत होता, असा तपशील त्यांनी सांगितला. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संध्याकाळी पाच वाजता एका बैठकीचं आयोजन केलं आहे. यात ते मुंबई पोलीस आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत भाष्य केलं आहे. या प्रकरणाची माहिती घेण्याच्या संदर्भात मी बैठक बोलावली आहे. हे प्रकरण देशस्तरावरचं आहे. त्यामुळं या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करुन मी माहिती घेईन आणि त्यानंतर यावर भाष्य करेन, असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

वेगवेगळ्या राज्यांमध्ये राबवण्यात आलेल्या मोहिमांच्या माध्यमातून या दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. देशभरात विविध शहरांमध्ये दहशतवादी घातपात घडवण्याची शक्यता असून सीमेपलिकडून हा कट शिजत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही विशेष मोहीम राबवण्यात आली, असं पोलिसांनी सांगितलं आहे. तर, महाराष्ट्रातील समीर आणि उत्तर प्रदेशातील तीन दहशतवाद्यांना अटक करण्यासाठी एटीएसची मदत घेण्यात आली होती. अटक केलेल्यांपैकी दोन दहशतवाद्यांना मस्कतमार्गे पाकिस्तानात नेऊन शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यात एके-४७ चालवण्याच्या प्रशिक्षणाचा समावेश आहे, अशी माहिती ठाकूर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *