महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ सप्टेंबर । अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) म्हणजेच गणपती विसर्जनाच्या (Ganpati Visarjan) दिवशी पुण्यातील सर्व दुकाने बंद (Pune shops will closed) ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानेच सुरू ठेवण्यात येणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांनी ही माहिती दिली आहे.
कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव आणखी वाढू नये यासाठी पुण्यातील निर्बंध विसर्जनाच्या दिवशी कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना परिस्थितीच्या संदर्भातील आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत अजित पवारांनी ही माहिती दिली.
गणपती विसर्जनासाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दी झाल्याने कोविड संसर्ग पसरण्याची भीती वर्तवण्यात येत असल्याने अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुणे आणि आसपासच्या परिसरात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे आता अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुण्यातील केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू राहणार आहेत. मृत्युदर कमी झाला, रुग्ण वाढ कमी झाली आहे. परिस्थिती अशीच राहिली तर 2 ऑक्टोबर ला नवा निर्णय घेऊ असंही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं आहे.