महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ सप्टेंबर । राज्यातील पाच महापालिका क्षेत्रातील अकरावी प्रवेशासाठी राबविलेल्या ऑनलाइन प्रक्रियेला यंदा विद्यार्थ्यांचा फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. मुंबईसह नागपूर, पुणे, नाशिक आणि अमरावती महापालिका क्षेत्रातील अकरावीच्या 50 टक्क्यांहून अधिक जागा यंदा रिक्त राहिल्या आहेत. तीन सर्वसाधारण गुणवत्ता यादीनंतर केवळ 55.74 टक्के विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले आहेत. पाच महापालिका क्षेत्रातील एकूण 1 हजार 494 कॉलेजमध्ये उपलब्ध असलेल्या 5 लाख 33 हजार 670 जागांसाठी फक्त 3 लाख 85 हजार 396 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यांपैकी केवळ 2 लाख 14 हजार 806 विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले आहेत. तब्बल 3 लाख 18 हजार 864 जागा (59.75 टक्के) अद्याप रिक्त आहेत.
मुंबई विभागात अकरावीच्या 3 लाख 20 हजार 500 जागा उपलब्ध होत्या. या जागांसाठी एकूण 2 लाख 41 हजार 899 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यांपैकी 1 लाख 30 हजार 651 विद्यार्थ्यांचेच प्रवेश झाले आहेत. तर अद्याप 1 लाख 89 हजार 849 जागा (59.24 टक्के) रिक्त आहेत. प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना आजपासून सुरू झालेल्या विशेष गुणवत्ता यादीत प्रवेशाची संधी मिळणार आहे. अर्ज करण्याची मुदत 20 सप्टेंबरपर्यंत असून यादरम्यान बायपह्कल शाखेसाठीही विद्यार्थी अर्ज करू शकतात. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना कोणते कॉलेज अलॉट झाले आहे हे 22 सप्टेंबरला समजणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगीनमध्ये कॉलेज अलॉटमेंटविषयी कळविले जाईल, असे शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेण्यासाठी 25 सप्टेंबरपर्यंत मुदत असून प्रवेशानंतर रिक्त जागांचा तपशीलही 25 सप्टेंबरला रात्री उशिरा वेबसाईटवर जाहीर केला जाणार आहे. यादरम्यान विद्यार्थी अल्पसंख्याक, मॅनेजमेंट, इनहाऊस कोटय़ातील प्रवेशासाठीही अर्ज करू शकतात.