महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ सप्टेंबर । गेल्या काही तेरा दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price Today) स्थिर आहेत. असे असले तरी बहुतांश ठिकाणी पेट्रोल 110 रुपये प्रति लीटरच्या आसपास आहे तर डिझेल 98 ते 100 रुपये प्रति लीटरच्या जवळपास आहे. दरम्यान सामान्यांच्या खिशाला यामुळे चाप बसत आहे. या परिस्थितीत सामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil Prices in International Market) किंमती वाढल्या आहेत, त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाचे दर (Fuel Prices in International Market) वाढल्यास तेल मार्केटिंग कंपन्यांवर (OMC) मार्जिनचा दबाव वाढू सकतो. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार येणाऱ्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत तेजी येऊ शकते.
मीडिया अहवालानुसार, सूत्रांनी अशी माहिती दिली आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलचे सरासरी दर ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत प्रति बॅरेल चार ते सहा डॉलर्सनी अधिक आहेत. असे असले तरी अद्याप किरकोळ किंमतीत वाढ झालेली नाही. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या स्तरावरच इंधनाचे दर राहिले तर तेल मार्केटिंग कंपन्या पेट्रोल-डिझलचे किरकोळ दर वाढवू शकतात. त्यामुळे सामान्यांना आणखी फटका बसण्याची शक्यता आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमती अनुक्रमे 17 जुलै आणि 15 जुलै रोजी वाढल्या होत्या. IOCL च्या मते, राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 101.19 रुपये आणि डिझेलचे दर 88.62 रुपये प्रति लीटर आहेत. तर आज मुंबईत पेट्रोल 107.26 रुपये प्रति लीटर आहे तर डिझेल 96.19 रुपये प्रति लीटर आहे. दरम्यान तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन लेटेस्ट इंधनाचे दर तपासू शकता.
जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये सरासरी आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल 3 डॉलरपेक्षा जास्त घसरल्या होत्या. अमेरिका आणि चीनकडून मिळालेल्या मिश्र आर्थिक आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर आणि वेगाने पसरणाऱ्या डेल्टा व्हेरिएंटमुळे आशियातील हालचालींवर निर्बंध आल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.