लहान मुलांच्या लसी संदर्भात अदर पूनावालांची मोठी घोषणा !

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ सप्टेंबर । अदर पूनावाला यांनी शुक्रवारी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले आहे. सिरमच्या कोवाव्हॅक्स लहान मुलांसाठी लसीच्या चाचण्या अगदी सुरळीतपणे सुरू आहेत. सर्व चाचण्या आणि प्रक्रिया जर व्यवस्थित पार पडली, तर पुढील वर्षाच्या सुरुवातीला अर्थात जानेवारी-फेब्रुवारी २०२२ मध्ये लहान मुलांसाठी लस उपलब्ध होईल, असे अदर पूनावाला म्हणाले आहेत. अनेक स्वयंसेवकांना तपासण्यांसाठी लसीचे डोस देण्यात आले आहेत. चाचण्या व्यवस्थित सुरू आहेत. या वर्षाखेरीसपर्यंत या चाचण्यांचा आढावा घेतला जाईल, असे देखील पूनावाला म्हणाले.

दरम्यान, अदर पूनावाला चाचण्यांच्या प्रक्रियेविषयी माहिती देताना म्हणाले, लहान मुलांसाठी ही लस किती सुरक्षित आहे हे तपासण्यासाठी आम्हाला किमान ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लागेल. टप्प्याटप्प्याने यावर आम्ही काम करत आहोत. १२ वर्षांच्या खालील मुलांचा देखील चाचण्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. सर्व पालकांना त्यांची मुले सुरक्षित हवी आहेत. आम्हाला याचा विश्वास वाटतोय की कोवाव्हॅक्सला पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापर्यंत मंजुरी मिळालेली असेल. मात्र, जेव्हा डीसीजीआयला हे करणे योग्य वाटेल, तेव्हाच हे घडू शकेल.

अमेरिकी लसनिर्मिती कंपनी असलेल्या नोवोव्हॅक्सने गेल्या वर्षी आपल्या लसीच्या उत्पादनासंदर्भात सिरम इन्स्टिट्युटसोबत करार केला आहे. या लसीचे NVX-CoV2373 अर्थात Covovax असे नाव आहे. भारतात चाचण्या घेतली जाणारी ही चौथी लस आहे. २ ते १७ या वयोगटात ही लस दिल्यानंतर संबंधिताची प्रतिकारशक्ती कसा प्रतिसाद देते आणि ही लस किती सुरक्षित आहे हे तपासण्यासाठी या चाचण्या घेतल्या जात आहेत. यासाठी देशभरातील एकूण १० ठिकाणांहून ९२० स्वयंसेवकांना लस देण्यात आली आहे. त्यापैकी २ ठिकाणे पुण्यातील आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *