सोनू सूदने केली २० कोटी रुपयांपेक्षा अधिकची टॅक्स चोरी : आयकर विभाग

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ सप्टेंबर । आयकर विभागाने आज एका निवेदनात अभिनेता सोनू सूदने २० कोटी रुपयांपेक्षा अधिकची टॅक्स चोरी केल्याचे म्हटले. सलग तीन दिवस त्याच्या मुंबईच्या घरी जाऊन आयकर विभागाने यासंदर्भात शोध घेतला होता. परदेशी देणगीदारांकडून सोनूने क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून २.१ कोटी रुपये गोळा केले असून परदेशी योगदान (नियमन) कायद्याचे उल्लंघन केले असल्याचेही आयकर विभागाकडून सांगण्यात आले आहे.

अभिनेता आणि त्याच्या सहकाऱ्यांची मालमत्ता असलेल्या परिसरात शोध सुरू असताना, टॅक्स चोरीचे पुरावे सापडले आहेत. अनेक बोगस घटकांकडून असुरक्षित कर्जाच्या रूपात सोनूने त्याच्या बेहिशेबी उत्पन्नाचा मार्ग काढला होता. अशा २० नोंदींचा वापर आतापर्यंतच्या तपासात केल्याचे उघड झाले आहे. तसेच संबंधित सर्वांनीच बोगस नोंदी दिल्याची बाब स्वीकारली आहे. त्यांनी रोख रकमेच्या बदल्यात चेक दिल्याचेही मान्य केले आहे. तसेच कर चुकवण्याच्या हेतूने खात्यांच्या पुस्तकात कर्ज म्हणून व्यावसायिक पावत्या छापल्या गेल्या असून त्याचा वापर गुंतवणूक करण्यासाठी आणि मालमत्ता घेण्यासाठी केला गेला आहे. आतापर्यंत एकूण २० कोटी रुपयांपेक्षा जास्त कर अशा पद्धतीने चुकवला असल्याचे आयकर विभागाने सांगितले.

सोनुवरील आरोपांनुसार, गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान जुलैमध्ये स्थापन केलेल्या त्याच्या ना-नफा सूद चॅरिटी फाउंडेशनने यावर्षी एप्रिल महिन्यापर्यंत १८ कोटींपेक्षा जास्त देणगी गोळा केली होती. त्यापैकी १.९ कोटी रुपये त्याने लोकांची मदत करण्यासाठी खर्च केले आणि उर्वरित १७ कोटी रुपये त्याच्या बँक खात्यात आहेत.

लखनऊमधील एका इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुपच्या विविध परिसरातील रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्ये सोनुने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. याठिकणी कर चोरी आणि पुस्तकांमधील अनियमित नोंदीशी संबंधित पुरावे सापडले आहेत. लखनऊच्या ग्रूपने बोगस बिलांच्या आधारे निधी वळवून गुंतवणूक केली आहे. आतापर्यंत अशा ६५ कोटींच्या बोगस कराराचे पुरावे सापडले असून १.८ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याचेही आयकर विभागाने आज आपल्या निवेदनात म्हटले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *