महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ सप्टेंबर । पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीचा नेत्रदीपक सोहळा सलग दुसऱ्या वर्षी कोरोना संकटामुळे झाकोळला आहे. तरीही मानाच्या श्रींसह महत्त्वाची गणेश मंडळे परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित करत यंदाही साधेपणाने गणरायाला निरोप देत आहेत. पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचे साधेपणाने विसर्जन करण्यात आले.
यंदा प्रथेनुसार महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकाळी दहा वाजता विसर्जन सोहळा सुरू झाला.
मानाच्या पहिल्या कसाब गणपतीचे विसर्जन वेळेनुसार झाले. महामारीच्या संकटामुळे गणपतीचे विसर्जन मंडळाच्या मंडपातच करण्यात आले. गणपतीच्या पालखीला महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह पोलीस सह अतिरिक्त पोलीस उपायुक्त रवींद्र शिसवे यांनी उपस्थिती लावली.
पुण्यातील मनाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन झाले आहे.
गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीचे ढोल ताशांच्या गजरात साडेबारा वाजता विसर्जन करण्यात आले. विसर्जन करण्यासाठी पर्यावरण पूरक हौद निर्माण करण्यात आला होता.
मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपतीचे विसर्जन झाले.
मानाच्या पाचव्या केसरी गणपतीचे वेळेआधीच १:२० मिनीटांनी विसर्जन करण्यात आले. महापौर मुरलीधर मोहोळ आणि पोलीस आयुक्त अभिनव गुप्ता यांच्या उपस्थितीत गणरायाचे विसर्जन करण्यात आले.