कोरोनापाठोपाठ आता डेंग्यूचे आव्हान

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० सप्टेंबर । कोरोनाचा दुसरा उद्रेक शमला नसतानाच डेंग्यू या विकाराच्या नव्या स्वरुपातील विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकासह 11 राज्यांना केंद्र सरकारने या संबंधात सावध केले असून दक्षतेचा इशारा दिला आहे. डेंग्यूचे हे नवे रुप जास्त वेगाने पसरणारे असून नेहमीच्या डेंग्यूपेक्षा जास्त धोकादायक आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य संघटनेने वक्तव्यात दिली आहे.

हा धोका अधिक दिसून आलेली 11 राज्ये आहेत. त्यात कर्नाटक आणि महाराष्ट्राचा समावेश आहे. या राज्यांमधील डेंग्यू रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे. पॉझिटिव्हिटी दरही वाढला आहे. या सर्व राज्यांनी या आजाराच्या चाचणीसाठी आवश्यक सामगी आणि औषधांचा साठा करून ठेवावा, अशी सूचनांही त्यांना करण्यात आली आहे. या राज्यांना रॅपिड रिस्पॉन्स दलेही सज्ज ठेवण्यास सांगण्यात आले आहे. डेंग्यूचे हे नवे स्वरुप ‘सेरोटाईप 2’ म्हणून ओळखले जाते.

नेहमीच्या डेंग्यूपेक्षा हा तीव्र स्वरुपाचा विषाणू आहे. त्यामुळे लोकांना सावध करण्यात यावे. हेल्पलाईन्स सज्ज ठेवण्यात याव्यात. प्रसार वाढू नये म्हणून उपाययोजना तयार ठेवाव्यात. जनजागृती अभियान चालविण्यात यावे. लोकांना प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देण्यात यावी. आरोग्यविषयक नियम समजावून सांगण्यात यावेत. स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात यावे. तसेच डासांच्या नियंत्रणासाठी जिल्हा पातळीवर तयारी करण्यात यावी. पायाभूत आरोग्य सेवा मजबूत करण्यात याव्यात, अशा अनेक सूचना करण्यात आल्या आहेत.

कोरोनासंबंधीही सावधानता

कोरोनाचा तिसरा उद्रेक होण्याची शक्यता अद्याप मावळलेली नाही. ऑक्टोबरच्या मध्यात हा तिसरा उद्रेक होऊ शकतो. सध्या सणासुदीचा कालावधी असल्याने गर्दी टाळणे अशक्य होत आहे. या स्थितीमुळे तर तिसऱया उद्रेकाचा धोका आणि संभाव्यता जास्तच वाढते. म्हणून सर्व राज्यांनी आरोग्य सेवा सज्ज ठेवावी. रुग्णालये आणि औषधोपचार यांची व्यवस्था आतापासूनच चोख ठेवावी, असे आवाहन केंद्र सरकारकडून राज्यांना करण्यात आले आहे. अन्य देशांचा अनुभव लक्षात घेता हा तिसरा उद्रेक जास्त व्यापक असू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त पूर्वतयारी करुन ठेवावी, असेही सुचविण्यात आले.

कोणती 11 राज्ये ?

आंध्रप्रदेश, गुजरात, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान, तामिळनाडू आणि तेलंगणा या 11 राज्यांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. या राज्यांमधील एकंदर 36 जिल्हय़ांमध्ये स्थिती आव्हानात्मक आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *