महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ सप्टेंबर । ग्वाल्हेर येथील 70 वर्षीय विमलचंद्र जैन यांनी खूप अनोखी कला जोपासली आहे. विमलचंद्र छिन्नी-हातोडय़ाचा सहाय्याने बल्बवर मंत्र कोरतात. या कोरीव कामासाठी त्यांना दोन ते तीन तास लागतात. या कलेबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
विमलचंद्र यांच्या कुटुंबीयांचे भांडय़ावर नाव कोरण्याचे दुकान होते. विमलचंद्र दुकानात बसून काकांचे कोरीवकाम बघायचे. त्यातूनच त्यांनी ही कला आत्मसात केली. सुरुवातीला ते पदके, ढाल आणि घडय़ाळांसारख्या भेटवस्तूंवर कोरीव करायचे. मोबाईलच्या प्लॅस्टिक भागावरही त्यांनी आपली कला दाखवली. त्यातूनच त्यांची कला बहरत गेली.
बल्बवर अक्षरे कोरण्याची कला कशी आत्मसात झाली, याची माहिती देताना विमलचंद्र जैन म्हणाले, नेहमीच्या अवजारांनी मी बल्ववर अक्षरं कोरू शकत नव्हतो. त्यामुळे मी जयपूरवरून खास अवजारे मागवली. काम सोपं नव्हते, पण हळूहळू मी त्यामध्ये काwशल्य मिळवले. मी काच आणि काचेच्या वस्तूंवर काम करू लागलो. बल्बची काच खूप नाजूक असल्याने सुरुवातीला मी खूप बल्ब तोडले. त्यामुळे खूप काळजीपूर्वक काम करावे लागते. हळूहळू काही अक्षरे कोरली आणि नंतर णमोकार मंत्र कोरला.
विमलचंद्र गेल्या 10-12 वर्षांपासून काचेवर अक्षरे कोरत आहेत. बल्बवर मंत्र कोरायला दोन ते तीन तास लागतात, असे त्यांनी सांगितले. या कलेबद्दल त्यांना अनेक सन्मान मिळाले आहेत.