महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ सप्टेंबर । पुणे महानगर क्षेत्रात जानेवारी ते जुलै २०२१ दरम्यान ५३ हजार घरांची विक्री झाली. जानेवारी ते जुलै २०१९ चा विचार करता त्यात आठ टक्क्यांनी वाढ झाली. २०१९ मध्ये ४९ हजार घरांची विक्री झाली होती, तर गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा पहिल्या सहामाहीत विक्रीमूल्यात तब्बल २७ टक्क्यांनी वाढ पाहायला मिळाली.
आकाराने मोठ्या असलेल्या घरांच्या खरेदीमुळे विक्री मूल्यात वाढ झाली आहे. ‘सीआरई मॅट्रिक्स’ने तयार केलेल्या ‘पुणे हाउसिंग रिपोर्ट’मध्ये ही माहिती दिली आहे. क्रेडाई पुणे मेट्रोच्या ३८ व्या सर्वसाधारण सभेमध्ये या अहवालाचे अनावरण केले. महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दिक्षीत, संचालक अतुल गाडगीळ, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष अनिल फरांदे, सचिव अरविंद जैन, उपाध्यक्ष रणजित नाईकनवरे, मनीष जैन, अमर मांजरेकर, राजेश चौधरी, आदित्य जावडेकर, विनोद चंदवानी, सीआरई मॅट्रिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक गुप्ता उपस्थित होते.
पुणे महानगर क्षेत्रातील बांधकाम क्षेत्राचा विचार करता जानेवारी ते जुलै २०१९ व २०२१ दरम्यान विक्री झालेल्या घरांची संख्या, आकार आणि किमती यांवर अहवालातील आराखडे बांधले आहेत.
हिंजवडी, वाकड, बाणेरला पसंती
हिंजवडी, वाकड, महाळुंगे, ताथवडे, बाणेर, सूस, बालेवाडी या पुण्याच्या वायव्य भागात गृहखरेदीला ग्राहकांकडून पसंती मिळत असून, जानेवारी ते जुलै २०२१ मध्ये या भागात तब्बल सात हजार १६० कोटी रुपये किमतीच्या घरांची विक्री झाली. शहराचा विचार केल्यास एकूण विक्रीच्या २६ टक्के विक्री ही एकट्या याच भागात झाल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे. या खालोखाल पिंपरी-चिंचवड भागात २३.५ टक्के विक्री झाल्याचे समोर आले आहे.