महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ सप्टेंबर । देशी गायींच्या संवर्धनातून त्यांची कार्यक्षमता वृद्धीतून दूध व दुग्धजन्य उत्पादनवाढीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत पुणे कृषी महाविद्यालयात देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र साकारत आहे. या प्रकल्पामध्ये देशभरातील विविध गायींवर संशोधन होत असून, हा प्रकल्प शेतकरी आणि पशुपालकांना फायदेशीर ठरणार आहे. या प्रकल्पासाठी दोन टप्प्यांत १ कोटी ७७ लाखांचा निधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिला आहे.
देशात आणि राज्यात विविध भागांमध्ये विविध जातींचे देशी गोवंश आहेत. मात्र, दूध देण्याची कमी क्षमता आणि व्यावहारिक आणि व्यावसायिक गणित बसत नसल्याने शेतकरी गोवंश पालनापासून दुरावला आहे. देशी गोवंशाचे दूध, मूत्र आणि शेणाच्या औषधी गुणधर्मामुळे मागणी वाढत आहे. मात्र, शेतकऱ्यांना गोवंश निवडीपासून ते प्रक्रिया उद्योगांपर्यंत योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने, शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
या प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी या प्रकल्पाबाबत माहिती दिली. डॉ. माने म्हणाले,‘‘अनेक शेतकरी देशी गोवंश पालनाकडे वळत आहेत. मात्र, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने देशभरातील विविध जातींच्या देशी गोवंशावर तुलनात्मक अभ्यास या प्रकल्पाद्वारे केला जाणार आहे. यामध्ये गायींची दूध देण्याची क्षमता, त्यांचा महाराष्ट्रातील हवामानाचा होणारा परिणाम, प्रजनन क्षमता तसेच गोमूत्र आणि शेणाचा देखील अभ्यास होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये १० गीर गायी आणि ६ रेड सिंधी या गाय आणल्या असून, टप्प्याटप्पाने पंजाब येथून साहिवाल, गुजरात येथून गीर आणि राजस्थान येथून राठी आणि थारपारकर गायी आणल्या जाणार आहेत. हा प्रकल्प पाच वर्षांचा असला तरी तो भविष्यात दीर्घकालीन संशोधनासाठी सुरुच राहणार आहे.’’
विविध गायींद्वारे दर्जेदार गोवंश निर्मितीसाठी टेस्टट्यूब तंत्रज्ञानाद्वारे नवीन पिढी निर्माण केली जाणार आहे. यासाठी एनडीडीबी बरोबर करार करण्यात येणार आहे. पुढील पाच वर्षांत १५० जातिवंत गोवंश निर्मिती केली जाणार आहे. यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
– डॉ. सोमनाथ माने, प्रमुख शास्त्रज्ञ, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र