महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ सप्टेंबर । कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून रुग्णसंख्याही नियंत्रणात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 7 ऑक्टोबर म्हणजेच घटस्थापनेच्या दिवसापासून सर्व धार्मिक स्थळे उघडण्याचा महत्त्वाचा निर्णय आज जाहीर केला.
मुख्यमंत्री म्हणाले, दुसऱया लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाक्य तिसऱया लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱयाच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल.
धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱयावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी नमूद केले आहे.
जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देताना प्रार्थनास्थळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मंदिरे उघडण्यावरून विरोधी पक्षांकडून राजकारण करण्यात येत होते. मात्र निर्बंध शिथिल करीत आहोत, धार्मिक स्थळांबाबतही योग्य वेळी निर्णय घेणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत मार्च 2020 ते 15 नोव्हेंबर 2020 पर्यंत धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली होती. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर 16 नोव्हेंबर 2020ला धार्मिक स्थळे सुरू झाली, अशातच एप्रिल 2021 मध्ये कोरोनाच्या दुसऱया लाटेचा कहर झाला. तत्काळ उपाययोजना म्हणून 6 एप्रिलपासून सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली. त्यानंतर सात महिन्यांनी पुन्हा 7 ऑक्टोबरपासून धार्मिक स्थळांचे दरवाजे भक्तांसाठी उघडणार आहेत.