रुग्णांना सेवासुविधा उपलब्ध करुन देण्याला प्राधान्य द्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ सप्टेंबर । सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या सेवा- सुविधा जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाकडून साधनसामुग्री, वैद्यकीय उपकरण, औषध साठा याचा वेळेत पुरवठा होत आहे. विविध योजनांचा लाभ रुग्णांना मिळावा यासाठी आरोग्य क्षेत्रातील काम करणाऱ्या प्रत्येकांनी रुग्णांना सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चिकलठाणा जिल्हा रुग्णालय येथे आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत केले.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर शेळके, महापालिकेचे डॉ. पारस मडंलेजा, डॉ. मुखेडकर, अति जिल्हा चिकित्सक डॉ. प्रदीप कुलकर्णी, डॉ. रेखा भंडारे यांच्या बरोबर विविध विभागाचे विभाग प्रमुख, परिचारिका, डॉक्टर्स, तंत्रज्ञ यांची उपस्थिती होती.

जिल्हा रुग्णालयात उपलब्ध असलेल्या डॉक्टरची संख्या, रुग्णांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा, आवश्यक असणारी यंत्र सामुग्री याचा विभागनिहाय आढावा टोपे यांनी घेतला. यामध्ये रुग्णवाहिका बदली वाहनचालक उपलब्धता, ब्लड बँक, क्ष-किरण व रेडिओलॉजी विभाग, सी टी स्कॅन मशिन, लेप्रोस्कोपी उपकरण याबरोबरच स्वच्छता, वीज, सुरक्षा, विशेषज्ञ वैद्यकीय प्रशिक्षण, एमआरआय मशिन याबाबत आढावा घेऊन संबधित पदधिकाऱ्यांचा तात्काळ ह्या सुविधा अद्यावत करुन वाढ करण्या बाबत निर्देशित केले. त्याचबरोबर जिल्ह्यातील कोविड परिस्थिती व लसीकरणाबाबत देखील आढावा घेतला.

मंत्री टोपे यांनी जिल्हा रुग्णालयाच्या सेवासुविधा बाबत पहिल्या व दुसऱ्या मजल्या वरील विभागात प्रत्यक्ष पाहणी केली तसेच जनरल वार्डातील रुग्णांसोबत संवाद साधला जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाना मिळणाऱ्या आरोग्य सुविधा विषयी प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *