महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ सप्टेंबर । पुणे शहरातील बेशिस्त रिक्षा चालकांविरूद्ध कारवाई करण्यासाठी वाहतूक कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यानुसार महिन्याभरात तब्बल 10 हजार 856 हून अधिक रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. प्रामुख्याने लायसन्स नसणे, बॅच नसणे, विना परमिट प्रवासी वाहतूक करणे, खाकी गणवेश नसणाऱ्या चालकांना कारवाईचा दणका देण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणात रिक्षाचालकांच्या सहभाग असल्यामुळे पोलिसांकडून त्यांची झाडाझडती सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार 1 ते 26 सप्टेंबर कालावधीत वाहतूक कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी तब्बल 8 हजार 502 रिक्षाचा युनीफॉर्म न घालणाऱ्याविरूद्ध दंडात्मक कारवाई केली. त्याशिवाय विना लायसन्स रिक्षा चालविणाऱ्या 1 हजार 605 जणांना कारवाईचा दणका देण्यात आला. बॅच नसणाऱ्या 752 रिक्षाचालकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे स्टेशन परिसरासह स्वारगेट, संगमवाडीमध्ये असलेल्या काही बेशिस्त रिक्षाचालकांची मग्रुरी उतरली आहे. दरम्यान, पोलिसांच्या कारवाईमुळे बहुतांश रिक्षा थांब्यावर चालकांकडून नियमांचे पालन केले जात असल्याचे दिसून आले आहे. विशेषतः ड्रेस आणि बिल्ला लावलेले बहुतांश रिक्षाचालक प्रवाशांना चांगली सेवा देत असल्याचे गुन्हे शाखेच्या ड्राईव्हमध्ये अनुभवास आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.