जोरदार पाऊस : राज्यातील 82 टक्के धरणे भरली, काही ओव्हरफ्लो

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ सप्टेंबर । राज्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील अनेक धरणे भरली असून तुफान पावसाने राज्यातली 82 टक्के धरणे भरली आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटला आहे. (Storage in dam in Maharashtra surges to 82%)

मोतीलाल तलाव ओव्हरफ्लो
मुसळधार पावसामुळे जालना शहरातील मोतीलाल तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. या तलावाच्या सांडव्याचं पाणी शहरातील दु:खीनगर, मिल्लतनगर भागातील घरांत शिरले. सध्या सांडव्याचं पाणी अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला असला तरी या पाण्याचं नियोजन करण्याचं आणि नाल्या साफ करण्याची मागणी स्थानिकांनी केलीय.

जायकवाडी धरणात चांगला साठा
जायकवाडी धरणात पाण्याची अवाक जोरात सुरु झाली आहे. त्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय, पाणीसाठा सुद्धा 88 वर गेलाय त्यामुळे कुठल्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडण्यात येतील असा इशारा जायकवाडी पाटबंधारे विभागाचे दिलाय, त्यामुळं गोदावरी पूर ग्रस्त रेषेवरील गावांना सतर्कतेचा इशारा द्यावा असे पत्र पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकारी यांना दिलेय

कवडास आणि धामणी धारण ओव्हरफ्लो
पालघर जिल्ह्यात धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने कवडास आणि धामणी धारण ओव्हरफ्लो झालेत. धामणी धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आलेत. जवळपास 9 हजार 500 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरूय. तर कवडास धरणातून सुमारे 9 हजार 200 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरूय. दोन्ही धरणे मिळून सूर्या नदीत 14 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरूय. त्यामुळे सूर्या नदीला पूर येण्याची शक्यताय.प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

अकोल्यातील सर्व धरणे भरलीत
अकोल्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसाने जिल्ह्यातील सर्व धरणं शंभर टक्के भरलीयत. महान, मोर्णा, मन, दगड पारवा आणि पूर्णा बॅरेज या धरणातून लाखो लिटर पाण्याचा विसर्ग होतोय. त्यामुळे जिल्ह्यातल्या काटेपूर्णा, मोर्णा, मन, पूर्णा अशा मोठ्या नद्यांसह नदी नाले ओसंडून वाहू लागले आहे.

इसापूर धरण 100 टक्के भरले
यवतमाळ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमधल्या मुसळधार पावसामुळे इसापूर धरण १०० टक्के भरलं आहे. धरणाचे १५ पैकी ११ दरवाजे उघडण्यात आलेत. त्याची दृश्य ड्रोन कॅमे-याद्वारे टिपण्यात आली आहेत. धरणातल्या विसर्गामुळे नदीकाठच्या अनेक गावांमधील शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

भीमाशंकर माळीन । डिंभे धरण
उत्तर पुणे जिल्ह्याच्या भीमाशंकर माळीन परिसरात पावसाचा जोर वाढला. त्यामुळे डिंभे धरणातून सायंकाळी ५ हजार ४० क्‍युसेक्सने घोडनदी पात्रात विसर्ग करण्यात आला. पावसाचा जोर वाढला तर धरणातून विसर्ग अजून वाढवला जाण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *