राज्याला गुलाब चक्रीवादळाचा फटका,; राज्यात हजारो कोटींचं नुकसान

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ सप्टेंबर । गुलाब चक्रीवादळामुळे गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस बरसतोय. या पावसानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. हजारो हेक्टरवरील पीकं पाण्याखाली गेल्यानं हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. शेतशिवाराचं मोठं नुकसान झालं आहे. बुलडाणा जिल्ह्यात सोयाबीन, तूर कपाशीचं मोठं नुकसान झालं आहे. याहीपेक्षा गंभीर म्हणजे शेत खरडून गेलंय त्यामुळे बळीराजच्या डोळ्यात अश्रूंचा पूर आला आहे.

गुलाब चक्रीवादळामुळे राज्यात 7 ते 8 हजार कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली आहे. आतापर्यंत या पावसाळ्यात 436 लोकांना जीव गमवावा लागला आहे. एकट्या सप्टेंबर महिन्यात 71 जणांचा पावसामुळे मृत्यू झाला आहे. तर 17 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. मृतांच्या वारसांना 4 लाखाची मदत केली जाणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.

अतिवृष्टीमुळे राज्यात प्रचंड नुकसान झालं आहे, यात कुणी राजकारण करू नये, केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र यात मदत केली पाहिजे असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. गेले दोन दिवस संततधार पावसाने अनेक भागातील नद्या ओसंडून वाहू लागल्या, धरणं ओसंडून वाहू लागली. त्यामुळे शेतीचं, मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे.

मराठवाड्यातील 10 पैकी 7 जिल्ह्यात 170 ते 180 मिमी पावसाची नोंद झाली आहे. उस्मानाबाद, लातूर औरंगाबाद एनडीआरएफच्या टीम पाठवल्या होत्या, जळगावला एसडीआरएफची टीम होती अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे. 17 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे, 81 पंचनामे झाले आहेत, 19 टक्के बाकी आहेत, हे नुकसान गुलाब चक्रीवादळाच्या आधीचे आहेत, आताचे पंचनामे झाले तर हा आकडा वाढेल, साधारणपणे 22 लाख हेक्टरवर हा आकडा जाईल असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *