देशात महागाईचा भडका ; भोपाळमध्ये पेट्रोल ११० रुपयांवर , डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० सप्टेंबर । कच्च्या तेलातील महागाईच्या पार्श्वभूमीवर एक दिवसआड पेट्रोलियम कंपन्यांची इंधन दरवाढ सुरूच आहे. आज गुरुवारी कंपन्यांनी पेट्रोलमध्ये २५ पैसे आणि डिझेलमध्ये ३० पैशांची वाढ केली. या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा भाव १०७.७१ तर डिझेलचा भाव ९७.५२ रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये पेट्रोलचा भाव ११० रुपयावर गेला आहे.

यापूर्वी मंगळवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ झाली होती तर बुधवारी इंधन दर स्थिर ठेवले होते. जागतिक कमॉडिटी बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव ८०.६९ डॉलर प्रती बॅरल इतका वाढला. आॅक्टोबर २०१८ नंतर हा सर्वाधिक दर आहे.युरोपात तेलाची मागणी वाढली असून पुरवठा मर्यादित असल्याने नजीकच्या काळात तेलाचा भाव आणखी वाढण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

आजच्या दरवाढीनंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढला आहे. मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.७१ रुपये झाला आहे. दिल्लीत पेट्रोल १०१.६४ रुपये झाले आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ९९.३६ रुपये इतका वाढला आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०२.१७ रुपये झाला आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११०.११ रुपयांपर्यंत वाढला आहे. बंगळुरात पेट्रोल १०५.१८ रुपये झाले आहे.

आज मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ९७.५२ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ८९.८७ रुपये आहे. चेन्नईत ९४.९५ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९२.९७ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९८.७७ रुपये असून बंगळुरात डिझेल ९५.३८ रुपये आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *