पुणेकर सायबर चोरट्यांच्या जाळ्यात, सप्टेंबर अखेर इतक्या कोटी रुपयांचा गंडा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ ऑक्टोबर । पुणेकरांना दिवसेंदिवस सायबर चोरट्यांकडून केल्या जाणाऱ्या फसवणुकीला सामोरे जावे लागत आहे. त्यानुसार मागील दहा महिन्यांमध्ये सायबर चोरट्यांनी 42 जणांची तब्बल 9 कोटी 18 लाखांची फसवणूक केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत फसवणूकीचे प्रमाण अडीच पटीने वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी 46 प्रकरणांमध्ये नागरिकांना 3 कोटी 70 लाखांचा गंडा घातल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

सायबर चोरट्यांकडून नागरिकांना हर्बल तेलाचा व्यापार, विमा आणि भेटवस्तूंचे आमिष दाखवून गंडविले जात आहे. त्याशिवाय सोशल मीडियावरील अनोळखी मैत्रीही अनेकांना आर्थिक फसवणूकीला कारणीभूत ठरत आहे. विशेषतः मौल्यवान वस्तू, दागदागिने, परदेशी चलन, कस्टम ड्युटीच्या नावाखाली लूट केली जात आहे.

फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरद्वारे जवळीक साधून सर्वाधिक फसवणूक केली जात असल्यामुळे पुणेकर ‘सॉफ्ट टार्गेट’ ठरत असल्याचेही चित्र आहे. दरम्यान, फसवणुकीनंतर तक्रारदाराने वेळेत सायबर पोलिसांकडे संपर्क साधल्यास बँक खाते किंवा ई-वॉलेट गोठविण्यासाठी प्राधान्य देण्यात येते. त्यानुसार सायबर विभागाने आतापर्यंत 35 लाखांची एकत्रित रक्कम असलेली खाती आणि ई-वॉलेट्स गोठवून पुणेकरांना 30 लाखांपर्यंत रक्कम परत मिळवून दिली आहे

हव्यासापोटी नागरिकांकडून अनोळखी लोकांसोबत एटीएम कार्डसह बँकखात्याची गोपनीय माहिती शेअर केली जाते. त्यामुळे सायबर चोरट्यांकडून ऑनलाईनरित्या गंडा घातला जातो. फसवणूकीच्या बहुतांश घटनांमध्ये आभासी ओळखीवर विश्वास ठेवला जातो. दोन्ही बाजूंनी ऑनलाईनरित्या संवाद साधून बँक खाते क्रेडेंशियल, यूपीआयचे तपशील आणि डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा डेटा घेउन बँकखाते रिकामे केले जात आहे.

यावर्षी सर्वाधिक तक्रारदार भेटवस्तूंना बळी पडले आहेत. त्यामध्ये पीडितांनी तब्बल 4.42 कोटी रुपयांची रक्कम गमावली आहे. मागील वर्षी नागरिकांनी डेबिट किंवा क्रेडिट कार्डची माहिती शेअर केल्यानंतर 1 कोटी 83 लाखांची फसवणूक केली होती. त्याशिवाय हर्बल ऑईल फसवणुकीच्या प्रकरणांत 1 कोटी 27 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पैसे हस्तांतरित करताना ई-बँकिंग सुविधेसह यूपीआयसंदर्भात सावधगिरी बाळगण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. सायबर विभागाने फसवणूकीच्या गुन्ह्याचे वर्गीकरण केले आहे. त्यानुसार चोरट्यांनी विविध प्रकारच्या 11 क्लृप्ती वापरून नागरिकांची फसवणूक केली आहे. त्यानुसार पोलिसांना 350 हून अधिक गुन्हे दाखल केले आहेत

अशा प्रकारे केली जातेय सायबर फसवणूक
डेबिटसह क्रेडिट कार्ड क्रेडेन्शियल वापरून मनी ट्रान्सफर
क्रेडेन्शियलद्वारे मनी ट्रान्सफरचा वापर
ऑनलाइन डेटिंग साइट फसवणूक
हर्बल ऑईल व्यवसायाचे आमिष
नोकरीच्या आमिषाने लुट
ओटीपी शेअर करून गंडा
लॉटरी लागल्याची बतावणी
कर्ज/ विमा फसवणूक
वैवाहिक/मैत्री किंवा भेटीची बतावणी
ई-कॉमर्स वेबसाइटद्वारे फसवणूक

फसवणूक झाल्यास इथे करा संपर्क
सायबर पोलिस व्हॉटस अप क्रमांक – 7058719371, 7058719375
सायबर पोलिस ठाणे – 020-29710097

सायबर चोरट्यांकडून टेक्नोसॅव्हीचा उपयोग करून नागरिकांना विविध आमिष दाखविले जाते. त्यानुसार हव्यासापोटी अनेकांकडून बँकखात्याची गोपनीय माहिती देणे, डेबीट आणि क्रेडीट कार्डचा पीन शेअर केल्यामुळे फसवणूक होते. दरम्यान, गोल्डन अवर्समध्ये तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित बँकखाते गोठवून पैसे परत मिळवण्यास प्राधान्य देण्यात येते.
– डी.एस. हाके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *