IPL 20221 प्लेऑफसाठी रस्सीखेच सुरूच; चौथ्या स्थानासाठी चार संघांमध्ये चुरस

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ ऑक्टोबर । आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या 14व्या हंगामामध्ये तीन संघांनी प्लेऑफचे तिकीट बुक केलंय. चेन्नई सुपर किंग्ज हा प्लेऑफ गाठणारा पहिला संघ ठरला. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स प्लेऑफसाठी पात्र ठरणारा दुसरा संघ ठरला. मग रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा पराभव करून प्लेऑफमधील स्थान पक्के केले. मात्र, प्लेऑफच्या चौथ्या स्थानासाठी कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्ज, राजस्थान रॉयल्स व मुंबई इंडियन्स या चार संघांमध्ये कमालीची चुरस बघायला मिळत आहे.

पंजाब संघ आयपीएलच्या गुणतालिकेत 10 गुणांसह पाचव्या स्थानी आहे. त्यांनी 13 सामन्यांत 5 विजय मिळविले असून 8 पराभव पत्करले आहेत. पंजाबचा केवळ एकच सामना शिल्लक आहे. त्यांना प्लेऑफ गाठण्याची संधी तशी खूपच कमी आहे. चेन्नईविरुद्धच्या अखेरच्या लढतीत बाजी मारली तरी पंजाबचे 12 गुण होतील. इतर तीन संघांनी एक-एक विजय मिळविल्यास पंजाबला प्लेऑफची संधी असेल. मात्र, नेट रनरेटच्या आधारावर चौथा संघ निश्चित होईल.

गुणतालिकेत कोलकात्याचा संघ सध्या चौथ्या स्थानावर आहे. त्यांनी 13पैकी 7 लढती गमावल्या असून त्यांची एक लढत शिल्लक आहे. राजस्थानविरुद्धची ही लढत जिंकल्यास कोलकात्याचे 14 गुण होतील व राजस्थानचे आव्हान संपुष्टात येईल. मात्र, मुंबईने उर्वरित दोन्ही लढती जिंकल्यास त्यांचेही 14 गुण होतील व नेट रनरेटच्या आधारावरच प्लेऑफचा चौथा संघ ठरेल. सध्या 10 गुण असलेल्या राजस्थान रॉयल्सने पुढील दोन्ही लढती जिंकल्यास कोलकात्यासह मुंबईचेही स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. कारण राजस्थानच्या राहिलेल्या दोन लढती या कोलकाता व मुंबई या संघांविरुद्ध आहेत.

नेट रनरेटला आले महत्त्व

कोलकाता संघ अखेरच्या लढतीत पराभूत झाला आणि मुंबई व राजस्थानने दोनपैकी एक लढत जिंकली, तर या तिन्ही संघांचे प्रत्येकी 12 गुण होतील. अशा परिस्थितीत नेट रनरेट महत्त्वाचा ठरणार आहे. ही परिस्थिती पंजाबसाठी प्लेऑफचा दरवाजा उघडू शकते. कारण पंजाबने चेन्नईविरुद्ध अखेरच्या साखळी लढतीत मोठा विजय मिळविल्यास 12 गुणांसह नेट रनरेटच्या जोरावर हा संघही प्लेऑफमध्ये दाखल होऊ शकतो. पंजाबची चेन्नईविरुद्धची लढत 7 ऑक्टोबरला होणार असून हैदराबाद आणि मुंबई यांच्यातील लढत 8 ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे प्लेऑफमधील चौथा संघ अखेरच्या दिवशी निश्चित होण्याची शक्यताही नाकारत येत नाही.

आयपीएल गुणतालिका

संघ सामने विजय पराभव गुण सरासरी

चेन्नई 12 9 3 18 0.829
दिल्ली 12 9 3 18 0.551
बंगळुरू 12 8 4 16 -0.175
कोलकाता 13 6 7 12 0.294
पंजाब 13 5 8 10 -0.241
राजस्थान 12 5 7 10 -0.337
मुंबई 12 5 7 10 -0.453
हैदराबाद 12 2 10 4 -0.475
(टीप- दिल्ली-चेन्नई लढतीपूर्वीची आकडेवारी)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *