श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात दररोज 5 हजार भाविकांना दर्शन; मंदिर 13 तास खुले राहणार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ ऑक्टोबर । शासन निर्णयानुसार गुरुवारी, 7 ऑक्टोबरपासून बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी सकाळी 7 ते रात्री 8 यावेळेत खुले राहणार आहे. दररोज पाच हजार भाविकांना दर्शन मिळेल, असा निर्णय मंगळवारी देवस्थान ट्रस्टच्या बैठकीत घेण्यात आला.

ट्रस्ट कार्यालयात मंगळवारी अध्यक्ष, जिल्हा न्यायाधीश विकास कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यावेळी प्रांत तेजस चव्हाण, जिल्हा न्यायालयाचे वरिष्ठ न्यायालयीन व्यवस्थापक अशोक दारके, तहसीलदार दीपक गिरासे, पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष समीर पाटणकर, विश्वस्त दिलीप तुंगार, प्रशांत गायधनी, सत्यप्रिय शुक्ल, तृप्ती धारणे, पंकज भुतडा, संतोष कदम, भूषण अडसरे, पुरोहित महासंघाचे मनोज थेटे उपस्थित होते. यावेळी दर्शन व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले.

मंदिरात मास्क, थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझरचा वापर बंधनकारक आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेले नसतील तर गेल्या 72 तासातील आरटीपीसीआरचा निगेटिव्ह रिपोर्ट सादर करणे आवश्यक आहे. दहा वर्षाआतील, 65 वर्षावरील, तसेच गर्भवती महिला, कोरोनाविषयक रेड झोन, कंटेन्मेंट एरिया आणि होम क्वॉरंटाईन असलेल्यांना प्रवेश मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नि:शुल्क दर्शनासाठी पूर्व महाद्वारासमोर दर्शन मंडप राहणार आहे, तर देणगी दर्शनासाठी पूर्वीप्रमाणेच प्रतीभाविक 200 रुपये असून, उत्तर महाद्वारातून त्यांच्यासाठी व्यवस्था आहे.

मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य करावे. परिसरात थुंकण्यास मनाई आहे, अन्यथा एक हजार रुपये दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी माहिती ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

गावकर्‍यांसाठी दर्शन वेळ निश्चित

त्र्यंबकेश्वर शहरातील गावकर्‍यांसाठी सकाळी 8 ते 10 आणि संध्याकाळी 5.30 ते 7.30 ही दर्शनाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. सोबत आधारकार्ड आणणे अनिवार्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *