महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ ऑक्टोबर । बारामती : येथील राज्य परिवहन मंडळाच्या आगारातून आता एसटी बसेसची संख्या वाढविण्यात आल्याची माहिती आगारप्रमुख अमोल गोंजारी यांनी दिली. कोरोनानंतर आता शाळा महाविद्यालयांसह मंदिरेही आजपासून सुरु झाल्यामुळे सोमवारपासून (ता. 11) बारामती आगारानेही फे-यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेली बारामती पुणे बारामती ही विनावाहक विनाथांबा बस सेवा सोमवारपासून पुन्हा कार्यरत होणार आहे. सकाळी पावणेसहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत दर अर्ध्या तासाला ही बस सोडली जाणार आहे. या शिवाय बारामती-जेजुरी- बारामती, बारामती-नीरा- बारामती, बारामती- फलटण-बारामती, बारामती- भिगवण-बारामती, बारामती- वालचंदनगर-बारामती, बारामती-एमआयडीसी-बारामती, बारामती- सुपा- बारामती या शटल सेवाही पूर्वीप्रमाणे सकाळी सात वाजल्यापासून नियमित सुरु करण्यात येणार आहेत.
कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे एसटीचे कमालीचे नुकसान झाले होते. सततच्या बंदमुळे एसटीची स्थिती डबघाईला आली होती, आता सर्वच जनजीवन सुरळीत होत असल्याने एसटीनेही पूर्वीप्रमाणेच फे-या करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे राज्य सरकारनेही आता शंभर टक्के क्षमतेने मात्र सर्व आवश्यक काळजी घेत प्रवासी वाहतूकीस एसटीला परवानगी दिली आहे, त्या मुळे एसटीनेही आता पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूकीस प्रारंभ केला आहे. बारामती पुणे रेल्वे सेवा बंद असल्याने एसटीची प्रवासी संख्या आता वाढू लागली आहे. त्या मुळे एसटीचे कामकाजही सुरळीत होऊ लागले आहे.