महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ ऑक्टोबर । भाजप खासदार वरुण संजय गांधी यांनी लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी आज एक व्हिडिओ ट्विट करून दोषींना शिक्षा करा, अशी मागणी केली. या प्रकरणी वरुण गांधी भाजपच्या भूमिकेच्या विरोधात बोलत असून त्यांना भाजपमध्ये रहाणे नकोसे झाले असावे, अशी चर्चा आहे. वरुण गांधी स्वतःच कॉंग्रेसच्या वाटेवर जाण्याची चिन्हे दिसतात, अशीही चर्चा आहे.
वरूण गांधी भाजपचे पिलीभीतमधील खासदार आहेत. त्यांच्या मतदारसंघाजवळच लखीमपूर आहे. हिंसाचाराची घटना घडल्यापासून वरुण गांधी शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत आहेत. भाजप सूत्रांनी सांगितले की, वरुण गांधी पक्षाच्या भूमिकेविरूद्ध बोलून उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तोंडावर विरोधात जाणार असतील तर २०२४ मध्ये त्यांना व त्यांच्या मातोश्री मेनका गांधी या दोघांनीही तिकीटाची अपेक्षा सोडलेली दिसते. मात्र उत्तर प्रदेश निवडणुकीपर्यंत भाजप स्वतःहून त्यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता नाही,असेही पक्षसूत्रांचे म्हणणे आहे. आजच्या भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीतून या गांधी मायलेकांची नावे दीर्घकाळानंतर कापण्यात आली आहेत. ही याची पहिली झलक मानली जात आहे. लखीमपूर प्रकरणी त्यांनी जो व्हिडीओ आज ट्विट केला तोच प्रियांका व अनेक विरोधी पक्षनेत्यांनीही ट्विट केला होता.
वरुण यांनी म्हटले की या व्हिडीओत सर्व स्पष्ट दिसते. विरोध करणाऱ्यांची हत्या करून त्यांना गप्प बसवता येत नाही. शेतकऱ्यांचे रक्त सांडणाऱ्यांची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या मनात सरकारची प्रतिमा ‘अहंकारी व क्रूर’ अशी होण्याआधीच न्याय झाला पाहिजे. वरुण गांधी यांनी यापूर्वीही असाच व्हिडीओ ट्विट केला होता.