महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० ऑक्टोबर । काल सायंकाळी सहा वाजल्यानंतर पुणे शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी (Heavy rainfall in pune) लावली आहे. तासभर पडलेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं शहरातील अनेक ठिकाणांना अक्षरश: झोडपून काढलं आहे. कमी वेळात पडलेल्या जास्त पावसामुळे शहरातील रस्ते दुथडी भरून वाहत होते. रस्त्यांवरून गुडघाभर पाणी वाहत असल्याने अनेक रस्त्यांना नदीचं रुप आलं होतं. यामुळे वाहतूक सेवा विस्कळीत होऊन अनेक ठिकाणी कोंडी (Traffic jam) झाली होती.
अचानक कोसळलेल्या या धुव्वाधार पावसामुळे घराबाहेर पडलेल्या नागरिकांची दाणादाण उडाली होती. रस्ते दुथडी भरून वाहत असल्याने वाहनांचा वेग मंदावला होता. भाजीविक्रेत्यांसह खरेदीदार आणि घराबाहेर फिरायला आलेल्या नागरीकांची चांगलीच तारांबळ उडाली.
गेल्या आठवडाभरात झालेल्या धुव्वाधार पावसाने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी केली होती. पण काल सायंकाळी झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली. ढगफुटी सदृश्य कोसळलेल्या या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं होतं. यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. घरात पाणी शिरल्याने दैनंदिन वापरातील अनेक वस्तू पाण्यात भिजल्या आहेत. तसेच महागड्या वस्तूमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचं लाखोंच नुकसान झालं आहे. तसेच पार्किंगमध्ये आणि रस्त्यावर उभी केलेली वाहनं देखील पाण्याखाली गेली आहे. कालच्या पावसाची विदारक दृश्य सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहेत.