महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० ऑक्टोबर । उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱयांना गाडीखाली चिरडून ठार मारल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ आणि शेतकरी एकाकी नाही हा विश्वास देण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीने सोमवारी ‘महाराष्ट्र बंदची’ हाक दिली आहे. उद्या मध्यरात्रीपासूनच बंदला सुरुवात होईल आणि महाविकास आघाडी या बंदमध्ये सर्व ताकदीनिशी उतरणार आहे.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांची आज संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी महाराष्ट्र बंदची माहिती देण्यात आली. लखीमपूर येथील घटना म्हणजे देशातील संविधानाची हत्या असल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत करण्यात आला.
यावेळी खासदार संजय राऊत म्हणाले की, शिवसेना या बंदमध्ये पूर्ण ताकदीने उतरणार आहे. लखिमपूर भागात जे घडले ते सरळसरळ या देशाच्या संविधानाची हत्या आहे, कायद्याची पायमल्ली आहे. जो अन्नदाता शेतकरी त्याला संपवण्याचे षड्यंत्र आहे. आम्ही शेतकऱयांच्या पाठीशी आहोत. याची सुरुवात महाराष्ट्रातून व्हावी यासाठी महाविकास आघाडीने बंदची हाक दिल्याचे त्यांनी सांगितले. या बंदमध्ये लोक स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवतील, असेही ते म्हणाले.