महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ ऑक्टोबर । देशभरात सलग सातव्या दिवशी इंधनाच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. इंडियन ऑईल, HPCL आणि BPCL या भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 30 पैसे तर डिझेलच्या दरात 35 पैशांनी वाढ केली आहे. त्यामुळे दिल्ली आणि मुंबईत इंधनाची किंमत विक्रमी पातळीवर पोहोचली आहे.
पेट्रोलियम कंपन्यांनी रविवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 110.41 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 101.03 रुपये मोजावे लागत आहेत. पुण्यात आज पेट्रोलचा दर 109.92 रुपये इतका आहे. तर डिझेलसाठी 98.98 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 104.44 आणि 93.17 रुपये इतका आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील. मुंबईत डिझेलने शनिवारीच 100 रुपयांचा विक्रमी टप्पा ओलांडला होता. तर दिल्लीत पेट्रोलच्या दराने पहिल्यांदाच 104 रुपयांची पातळी ओलांडली आहे.
कच्च्या तेलाचे दर सात वर्षांतील उच्चांकी पातळीवर
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या NYME क्रूडचा दर 78.17 डॉलर्स प्रतिबॅरल इतका झाला आहे. हा गेल्या सात वर्षांतील उच्चांकी दर आहे. तर ब्रेंट क्रूडची किंमत प्रतिबॅरल 81 डॉलर्स इतकी आहे. कोरोनामुळे खनिज तेलाचे कमी झालेले उत्पादन तातडीने वाढवणे शक्य नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत ब्रेंट क्रूड 90 डॉलर्स प्रतिबॅरलची पातळी गाठेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
दररोज 6 वाजता बदलतात किमती
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.