कोरोना व्हायरसच्या भीतीने गुंतवणूकदारांनी फिरविली पाठ, जागतिक बाजारातील क्रूड ऑईलचे भावही घसरले

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 –

जगभरात हाहाकार माजविणार्‍या कोरोना व्हायरसच्या भीतीने गुंतवणूकदारांनी पाठ फिरविल्याने जागतिक बाजारातील क्रूड ऑईलचे भावही घसरले आहेत. बाजारात 70 डॉलर्स प्रतिबॅरेलच्या दिशेने प्रवास करणार्‍या क्रूड ऑईलचा फ्युचर ट्रेडमधील भाव 50 डॉलर्स प्रतिबॅरेल खाली घसरला असून तेल गुंतवणूकदारांसह तेल उत्पादक देशांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.

जागतिक बाजारात क्रूड ऑईलच्या मे महिन्यातील फ्युचर ट्रेड सध्या 49.99 डॉलर्सवर दिसत आहे. तो 1.74 डॉलर्स अथवा 3.3 टक्क्यांनी घसरला असून जुलै 2017 नंतर क्रूड ऑईलच्या भावातील झालेली ही मोठी घसरण आहे. अमेरिकन क्रूड ऑईलच्या भावातही  एका आठवड्यात 15 टक्क्यांनी भाव घसरून ते 45.20 डॉलर्सपर्यंत खाली उतरले आहेत. या पार्श्‍वभूमीवर तेल उत्पादक देशांच्या ओपेक या संस्थेने याविषयीचे धोरण निश्‍चित करण्यासाठी व्हिएन्ना येथे 5 व 6 मार्च रोजी बैठक बोलाविली असून या बैठकीत पुढील दिशा निश्‍चित केली जाईल.
चीन हा क्रूड ऑईलचा मोठा ग्राहक आहे. चीनमध्ये सध्या कोरोना विषाणू थैमान घालत असल्याने तेथे तेलाची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. याखेरीज जगातील 51 देशांना आपल्या कवेत घेऊ पाहणार्‍या या विषाणुमूळे संबंधित राष्ट्रांतील अर्थव्यवस्थेवर चिंतेचे सावट निर्माण होताना काही राष्ट्रांनी खबरदारीचे उपाय म्हणून देशाच्या हवाई सीमाही सिलबंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, विमान वाहतुकीसाठी लागणार्‍या इंधनाची मागणीही मोठ्या प्रमाणात घटते आहे. मागणी घटल्यामुळे इंधनाच्या दरातील होणारी घसरण रोखण्यासाठी ओपेकचा प्रमुख सदस्य असलेल्या सौदी अरेबियाने तेल उत्पादनात कपातीचा निर्णय घेतला आहे. ही कपात प्रतिदिन 10 लाख बॅरेल्स एवढी असू शकते. यापूर्वी प्रतिदिन 6 लाख बॅरेल्स कपातीच्या निर्णयावर विचार सुरू होता. परंतु मागणीच घटल्याचे पाहून कपात वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबियाबरोबर ओपेकच्या बैठकीतही तेल उत्पादनाच्या कपातीचा निर्णय अपेक्षित आहे.

चीनमधील पर्यावरण सुधारले…

कोराना विषाणूमुळे चीनमध्ये इंधनाचा खप सध्या कमालीचा घसरला आहे. उत्तर आणि मध्य चीनमध्ये तर हा खप अत्यल्प पातळीवर जाऊन पोहोचला आहे. परिणामी, चीनच्या या भागातील पर्यावरणाचा नकाशा मात्र सुधारलेला दिसत आहे. याविषयी गुगलवर 1 ते 20 जानेवारी व 1 ते 20 फेब्रुवारी या कालावधीतील 2 नकाशे प्रसिद्ध झाले आहेत. यामध्ये वुहान भागात हवेतील नायट्रोजन डायऑक्साईडचे प्रमाण जवळजवळ शून्यावर आल्याचे दिसते. ही स्थिती अत्यंत शुद्ध हवेची म्हणून ओळखली जाते. हे चित्रच बोलके असून वाढत्या इंधनाचा पर्यावरणावर किती दुष्परिणाम होतो, याचा पुरावाच जणू उपलब्ध करून दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *