महाराष्ट्र 24 – पुणे
कडकनाथ कोंबडी घोटाळ्याची चर्चा महाराष्ट्रात सुरू होऊन अनेक महिने होऊन गेले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातून, विशेषत: सांगली, कोल्हापूरमधून कडकनाथ कोंबड्यांचा व्यवसाय करणाऱ्यांच्या आर्त हाका यायला लागूनही आता बरेच दिवस झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर हे प्रकरण बाहेर आलं आणि त्याला राजकीय रंगही मिळाला, आरोप-प्रत्यारोप झाले. त्यानंतर सरकार बदललं. दरम्यानच्या काळात पोलिसांनीही काही कारवाई केली.
काही अटका झाल्या, काहींच्या ताब्यासाठी न्यायालयात जावं लागलं. वेळ जातो तशी चर्चा कमी होत जाते. पण जी घरं, जे संसार कडकनाथच्या या उद्योगात होरपळले ते अजूनही तसेच आहेत. या घोटाळ्याच्या व्याप्तीची शक्यता वाढते आहे, पण सरकारही अधिक शेतकरी त्यात अडकू नयेत म्हणून काही करत असल्याची चिन्हं नाहीत. काही वर्षांपासून कडकनाथ हा एक चांगला पशुसंवर्धनाचा व्यवसाय म्हणून सुरू झाला. गेल्या साधारण पाच वर्षांच्या कालावधीत कडकनाथ कोंबड्यांचा बोलबाला झाला. सगळ्यांच्या, विशेषत: मांसाहारींच्या तोंडी हे नाव यायला लागलं.
महाराष्ट्रभरात कडकनाथ चिकन मिळणाऱ्या हॉटेल्सबाहेर बोर्ड दिसायला लागले. त्यासोबतच या काळ्या रंगाच्या कोंबड्याच्या मांसाच्या आणि अंड्याच्या औषधी गुणधर्माचे दावेही चर्चिले जाऊ लागले. या कोंबड्यांच्या व्यवसायाच्या यशस्वितेच्या कहाण्याही केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यांतूनही समोर आल्या. गुजरात सरकारनं तर ज्या घरांमध्ये, विशेषत: ग्रामीण आणि दुर्गम, कुपोषित मुलं आहेत तिथं कडकनाथ कोंबड्या वाटण्याची योजनाही आखली. पण दुसरीकडे कोंबड्यांच्या या जातीचं जेव्हा चांगलं नाव झालं, तेव्हा त्यातून चेन मार्केटिंग करत मोठा नफा कमावण्याचे उद्योगही झाले आणि तिथं गणित फसलं.
सांगली, सातारा, कोल्हापूर या पट्ट्यात या कोंबड्यांच्या व्यवसायानं महाभारत घडवलं. पश्चिम महाराष्ट्रात फिरतांना प्रत्येक गावागणिक लोक भेटतात आणि असं वाटतं की जणू प्रत्येक गावच या घोटाळ्याचं शिकार बनलं आहे. कडकनाथ कोंबडी घोट्याळ्यात पश्चिम महाराष्ट्रातली गावंच्या गावं अडकली आहेत. लोकांच्या आयुष्याची कमाई गेली आहे, भविष्याची तरतूद गेली आहे.
पाच लाखांची गुंतवणूक
सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातल्या बहादुरवाडीत चंद्रकांत खोत यांचा 12 एकरवर ऊस आहे. वडिलोपार्जित जमिन आहे. त्यांचं शिक्षण चांगलं झालं, प्रगतिशील शेतकरी झाले. वडिलोपार्जित शेती करण्यासोबतच जोडधंदा करावा म्हणून त्यांनी कुक्कुटपालनाचा व्यवसायही सुरू केला. गेल्या वर्षी त्यांनी कडकनाथच्या एका खाजगी कंपनीनं सुरू केलेल्या योजनेबद्दल ऐकलं आणि त्यात पाच लाखांची गुंतवणूक केली. साडेतीनशे कोंबड्या त्यांच्या शेतावरच्या शेडमध्ये आणल्या. आता त्यातल्या आठ दहा शिल्लक आहेत. काही मेल्या आणि बऱ्याचशा विकल्या. ज्या योजनेत पैसा गुंतवला होता, त्यातनं एकही रुपया मिळाला नाही.
“ते औषधी आहे, ते साखरेच्या पेशंटना जातंय, बीपीला जातं, अंडं देशाबाहेर जातं असं आम्हाला सांगितलं. त्यांनी काय केलं की आमच्याकडनं अंडी घ्यायची, हॅचरीमध्ये पाठवायची, ती उबवून दुसऱ्या कस्टमरला पाठवायची. म्हणजे आम्हाला लुटायचं आणि त्यांचं लुटलेलं आम्हाला द्यायचं,” चंद्रकांत खोत सांगतात.