महाराष्ट्र 24 – एर्नाकुलम
कोरोना विषाणूबाधेची लक्षणे आढळलेल्या एका 36 वर्षीय युवकाला एर्नाकुलमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला आहे. युवकाचा मृत्यू कोरोना विषाणूमुळे झाला किंवा कसे, याचा शोध डॉक्टरांकडून घेतला जात आहे. कोरोना विषाणूमुळे त्याचा मृत्यू झाला, की न्यूमोनियामुळे याबाबत या क्षणापर्यंत संभ्रम कायम आहे. रविवारीही त्याच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकलेले नाही. मृत युवक मलेशियातून आलेला होता. तो मूळ पय्यूनर गावचा आहे. आधीच त्याचे नमुने घेऊन विषाणू शोध संस्थेला पाठविण्यात आले होते. त्याचा पहिला अहवाल हा निगेटिव्ह आला होता. डॉक्टरांना आता त्याच्या मृत्यूनंतरच्या नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
युवकावर उपचार करणार्या डॉक्टरने सांगितले की, तो एर्नाकुलम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होता. अत्यंत जबाबदारीने त्याच्यावर उपचार करण्यात आले. तो कोरोनाबाधित देशातून आलेला आहे म्हटल्यावर त्याला वेगळ्या स्वतंत्र कक्षात दाखल केलेले होते. त्याचे नमुनेही निगेटिव्ह आलेले होते. गेल्या 5 दिवसांपासून त्याला न्युमोनिया झाला होता. डॉक्टर म्हणाले की, त्याला आधीच मधुमेहही होता. बहुतांश अवयव निकामी झाल्यामुळे शुक्रवारी रात्री साडेबारा वाजता तो मरण पावला.
विस्तृत व सूक्ष्म तपासणीसाठी त्याचे नमुने अलापुझातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत पाठविलेले आहेत. अद्याप अहवाल आलेला नाही. शुक्रवारीच तो मलेशियाहून कन्नूरला परतला होता. तीव्र ताप होता आणि श्वास घेण्यातही त्याला अडथळे येत होते. साधारणपणे हीच कोरोना विषाणू लागण होण्याची लक्षणे आहेत. तो जेव्हा विमानतळावर उतरला होता तेव्हा थर्मल स्क्रिनिंगदरम्यानच त्याची प्रकृती कमालीची बिघडलेली होती. हा रुग्ण प्रशासनाच्या चर्चेचा विषय बनला होता. एर्नाकुलमचे जिल्हाधिकारी एस. सुहासही शुक्रवारी त्याची चौकशी करायला म्हणून महाविद्यालयात आले होते.भारतातील कोरोना विषाणूच्या बाधेची तिन्ही प्रकरणे केरळातच आढळली आहेत. तिघांच्याही प्रकृतीत उपचाराअंती सुधारणा झाल्याने ते आता सामान्य जीवन जगत आहेत.