पुणे, पिंपरी-चिंचवड शहर पेट्रोलचा दर ११० रुपयांपार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ ऑक्टोबर । पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात पेट्रोलच्या दराने लिटरमागे ११० रुपयांचा टप्पा ओलांडला असून, गुरुवारी शहरात पेट्रोलचा दर ११०.२५ रुपये लिटर झाला. डिझेलच्या दरानेही मोठी उसळी घेतली असून, ते शंभर रुपये लिटरच्या जवळ पोहोचले आहेत. शहरात सध्या डिझेलचा दर ९९.३६ रुपये लिटर आहे. शहरात ३१ मे रोजी पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली होती. त्यानंतर साडेचार महिन्यांत पेट्रोलच्या दरात दहा रुपयांहून अधिकची वाढ झाली आहे.

ऑल इंडिया पेट्रोल डिलर असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी शहरातील पेट्रोल, डिझेलच्या नव्या दरांबाबतची माहिती दिली. सप्टेंबर महिन्यात पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ काही दिवस थांबली होती. मात्र, २८ सप्टेंबरपासून पुन्हा त्यात वाढ सुरू झाली. रोजच काही पैशांनी पेट्रोल- डिझेलचे दर वाढत गेले. २८ सप्टेंबरला १०७ रुपये लिटर पेट्रोल, तर ९५.२६ रुपये लिटर दराने शहरात डिझेल मिळत होते. त्यात रोजच्या वाढीमुळे गेल्या पंधरा दिवसांत पेट्रोलच्या दरात ३.१५ रुपये, तर डिझेलच्या दरात सुमारे चार रुपयांची वाढ झाली आहे.

शहरात ३१ मे रोजी पेट्रोलचा दर लिटरमागे शंभर रुपये झाला होता. या दिवशी शहरात १००.१५ रुपये लिटर पेट्रोल होते. डिझेलचा दर या दिवशी नव्वदीपार जाऊन ९०.७१ रुपयांवर पोहोचला होता. साडेचार महिन्यांमध्ये पेट्रोलच्या दरात सुमारे दहा रुपये, तर डिझेलच्या दरात लिटरमागे नऊ रुपयांची वाढ झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शहरात पेट्रोलचा दर लिटरमागे ९० रुपये, तर डिझेलचा दर ७९ रुपये होता. त्यात सध्या अनुक्रमे २० आणि १९ रुपयांनी वाढ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *