महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ ऑक्टोबर । पुण्यातील सारसबाग (Saras baug Pune) येथे असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरातील (Shri Mahalaxmi Temple Pune) देवीला सोन्याची साडी (Gold Saree) अर्पण करण्यात आली आहे. मंदिर प्रशासनाकडून ही साडी अर्पण करण्यात आली आहे. ही साडी तब्बल 16 किलो वजनाची इतकी आहे. वर्षभरात केवळ दोन वेळा म्हणजेच दसरा (Dussehra) आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्यात येते. त्यामुळे श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता देवीभक्तांनी गर्दी केली.
दक्षिण भारतातील कारागिरांनी 10 वर्षांपूर्वी ही सोन्याची साडी साकारली आहे. सुमारे 6 महिने ही साडी तयार करण्याचे काम सुरु होते. आकर्षक नक्षीकाम करुन ही सोन्याची साडी साकारण्यात आली असून श्री महालक्ष्मी देवीला सोन्याच्या साडीने आभूषित करण्याचे हे 11 वे वर्ष आहे. दसऱ्याच्या दिवशी हळदी-कुंकू आणि ओटीच्या कार्यक्रमाने नवरात्रोत्सवाचा समारोप झाला असी माहिती मंदिराचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल यांनी दिली.
दसऱ्याच्यानिमित्त मंदिरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती. रात्री उशीरापर्यंत भाविक कोविडचे सर्व नियम पाळून दर्शनासाठी येत होते. महालक्ष्मी मंदिराच्या वेबसाईट www.mahalaxmimandirpune.org यावरुन ऑनलाईन पूजा संकल्प तसेच फेसबुक पेज आणि युट्यूब तसेच स्थानिक केबलवर जास्तीत जास्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा.
श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने नवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षी ही साडी नेसविण्यात येते. यावेळी मंदिराचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड.प्रताप परदेशी, विश्वस्त नगरसेवक प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, रमेश पाटोदिया, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, नारायण काबरा आदी मान्यवर उपस्थित होते.
नवरात्र उत्सवात यंदा धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारे नानाविध उपक्रम राबविण्यात आले. उत्सवात श्री सुक्त अभिषेक, श्री महालक्ष्मी महायाग, श्री दुर्गासप्तशती महायाग, सुप्रभातम् अभिषेक असे धार्मिक कार्यक्रम मंदिरामध्ये झाले. धार्मिक कार्यक्रमांसोबतच कर्तृत्ववान महिलांचा सन्मान, लस देणा-या सेवकांचा गौरव, कोविड काळात पालकत्व हरपलेल्या व देवदासिंच्या कन्यांचे पूजन, सैनिकांच्या वीरमाता व वीरपत्नींचा सन्मान, पोलीस खात्यातील महिलांचा गौरव असे सामाजिक कार्यक्रम देखील मंदिरात आयोजित करण्यात आले होते अशी माहिती मंदिराच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांनी दिली.