महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ ऑक्टोबर । EPFO News : आजकाल कार्यालयाकडून सतत मेसेज येत आहेत की, जर तुम्ही ईपीएफओमध्ये नामांकन केले नसेल तर ते त्वरित करा. दुसरीकडे ईपीएफओने ग्राहकांना ऑनलाईन ई-नामांकन करण्यास सांगितलेय. ईपीएफओने एका ट्विटमध्ये ई-नामांकन ऑनलाईन सादर करण्याच्या सुविधेबद्दल आपल्या ग्राहकांना माहिती दिली. ईपीएफओने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “सदस्याने आपल्या कुटुंबाच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी ई-नामांकन सुविधेचा लाभ घ्यावा.
विमा सेवा ऑनलाईन मिळवण्यासाठी आजच आपले ई-नामांकन दाखल करा
भविष्य निर्वाह निधी (PF), पेन्शन आणि विमा सेवा ऑनलाईन मिळवण्यासाठी आजच आपले ई-नामांकन दाखल करा. ईपीएफओचे म्हणणे आहे की, ग्राहकाने आपली पत्नी, मुले आणि पालकांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांच्या पीएफ, पेन्शन आणि विम्याद्वारे त्यांच्या संरक्षणासाठी नामांकन दाखल करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ईपीएफओने व्हिडीओ जारी करून ऑनलाइन ई-नामांकन करण्याची संपूर्ण पद्धत सांगितली आहे. ईपीएफओमध्ये ऑनलाईन नामांकन करण्यासाठी प्रथम तुम्हाला ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईट www.epfindia.gov.in ला भेट द्यावी लागेल. वेबसाईटवर तुमचे पेज उघडण्यासाठी तुम्हाला तुमचा यूएएन नंबर आणि पासवर्ड टाकावा लागेल.
Members should file e-Nomination today to provide #SocialSecurity to their families. Follow these easy steps to file EPF/EPS nomination #digitally.
Link:- https://t.co/91gAey9WZ0#SocialSecurity #EPF #PF #EDLI #Pension #ईपीएफओ #ईपीएफ
— EPFO (@socialepfo) October 12, 2021
आता इथे तुम्हाला ई-नामांकन पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुमच्या समोर उघडणारं पेज यूएएन, नाव आणि जन्मतारीख या सदस्याची संपूर्ण माहिती दिसेल. कृपया या पानावर तुमची वैयक्तिक माहिती अपडेट करा. नामांकन अद्ययावत करण्यासाठी आता तुम्हाला YES पर्यायावर क्लिक करावे लागेल. कुटुंब सदस्यांची माहिती येथे अपडेट करा. आता तुम्हाला नामांकन पर्याय पूर्ण करावा लागेल. ज्या व्यक्तीला तुम्ही नामनिर्देशित करू इच्छिता त्याचे नाव, फोटो, जन्मतारीख, संबंध, पत्ता, बँक खाते क्रमांक आणि आधार क्रमांक टाकावा लागेल. यानंतर तुम्ही एकापेक्षा जास्त नामनिर्देशित व्यक्तींचा तपशील Add पंक्ती पर्यायाद्वारे भरू शकता.
ई-नामांकन ईपीएफओमध्ये प्रविष्ट करताच त्याची नोंदणी केली जाणार
इथे तुम्हाला ठरवायचे आहे की तुम्हाला किती EPF नामनिर्देशित व्यक्तीला द्यायचे आहे. येथे त्या भागाची टक्केवारी प्रविष्ट करून सेव्हच्या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला ई-साईन टॅबवर क्लिक करून एक ओटीपी जनरेट करावा लागेल. त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक OTP येईल. आपले ई-नामांकन ईपीएफओमध्ये प्रविष्ट करताच त्याची नोंदणी केली जाईल. आपण नामांकन हे पृष्ठ देखील डाऊनलोड करू शकता.