Gold Price : यंदाचा सोने खरेदीचा कल चांगला; दिवाळीत सोन्याच्या किंमती वाढण्याची शक्यता

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ ऑक्टोबर । कोरोनाची परिस्थिती निवळत असतानाच दसऱ्याच्या मुहूर्तावर सुवर्णकारांचा व्यवसाय बऱ्यापैकी झाल्याने ते आनंदी झाले आहेत. अर्थात, कोरोनापूर्व काळातील सणापेक्षा कालचा व्यवसाय जेमतेम निम्माच होता, असेही सांगितले जात आहे. तरीही ग्राहकांचा खरेदीतील उत्साह पाहून व्यावसायिकांचीही मरगळ दूर झाली असून काहीसे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.

दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने ६०० रुपयांनी स्वस्त झाले. त्यानंतरही सोन्याचे दर साधारण तसेच राहिले आहेत. आता दिवाळीच्या तोंडावर पुन्हा दागिन्यांसाठी मागणी वाढेल आणि एका तोळ्याचे दर ५० हजारांच्या जवळपास जातील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

यंदाचा सोने खरेदीचा कल चांगला होता. या वर्षी लग्नेही भरपूर आहेत. कोरोनाची भीतीही गेल्याने ग्राहकांनी खरेदी केली. अर्थात कोरोनापूर्व काळातील खरेदीची आता तुलनाच करता येणार नाही. कालच्या उलाढालीची नेमकी आकडेवारी वर्ल्ड गोल्ड कौन्सिलतर्फे लवकरच जाहीर होईल, असे हॉलमार्किंग सेंटरचे सरचिटणीस अभिषेक निकम म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *